वयाच्या २४ व्या वर्षी आयएएस झालेल्या सविता प्रधान यांचा संघर्ष प्रवास पाहू…
आज जवळपास सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वतःचे नाव कोरले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज त्या घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत आहेत. तर आज आपण अशाच एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळे त्या पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २४ व्या वर्षी आयएएस झाल्या आणि महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. सविता प्रधान यांची संघर्षगाथा ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील एवढं नक्की.
आयएएस अधिकारी सविता प्रधान यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंडी गावात आदिवासी कुटुंबात झाला. सविता प्रधान यांचे कुटुंब प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत होते. सविता प्रधान यांना शाळेत मिळालेली शिष्यवृत्ती त्यांना पालकांनी शाळेत पाठवल्याचा एकमेव पुरावा होता. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या गावातील पहिली मुलगी ठरल्या. त्यानंतर घराचे भाडे भरण्यासाठी त्यांच्या आईने पार्ट-टाइम नोकरी शोधली आणि मग सविता प्रधान यांची शाळा असणाऱ्या गावात त्यांचे कुटुंब स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांनी विज्ञानाचा अभ्यास केला आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले.
सविता प्रधान यांचे शालेय जीवन पूर्ण होत असताना वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना एका श्रीमंत कुटुंबाकडून लग्नासाठी स्थळ आले. त्यानंतर पालकांच्या सांगण्यानुसार त्यांनी लग्न केले आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. सविता प्रधान यांच्या सासरी त्या घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्या. सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर अनेक बंधने, नियम तर कौटुंबिक अत्याचार झाले. सविता प्रधान यांना वेगळं जेवण बनवून खायला सांगायचे, त्यांचा नवरा मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा द्यायचा. लग्नानंतर दोन मुलं होऊनसुद्धा सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला. या सर्व गोष्टींना कंटाळून एके दिवशी सविता प्रधान यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
सविता प्रधान पंख्याला गळफास लावून घेत असताना त्यांची सासू खिडकीतून सर्व बघत होत्या. तसेच दुसरीकडे त्यांच्या नवऱ्याला हे कळताच त्यांनी लहान मुलांना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सविता प्रधान यांनी मुलांना नवऱ्याकडून हिसकावून घेतले. तेव्हाच सविता प्रधान यांच्या लक्षात आले की, मुलांसाठी आपल्याला जिवंत राहावेच लागेल. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह, हातात फक्त २७०० रुपये घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचे एक ब्युटी पार्लर उघडले आणि मुलांना शिकवले.
यादरम्यान सविता प्रधान यांनी भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठात सार्वजनिक प्रशासनात बी.ए.साठी प्रवेश घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा यांची माहिती दिली. मेहनतीमुळे आणि जिद्दीने त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी त्या आयएएस झाल्या आणि मुख्य पालिका अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. यादरम्यान त्यांची आई आणि भावंडानी त्यांना पाठिंबा दिला.
सध्या सविता प्रधान या ग्वाल्हेर आणि चंबळ प्रदेशांसाठी नागरी प्रशासनाच्या सहसंचालकाची भूमिका सांभाळत आहेत. पहिल्या लग्नाचा घटस्फोट दाखल केल्यानंतर त्यांनी दुसरं लग्नही केले. तसेच त्यांचे ‘हिम्मतवाली लडकियां’ या नावाचे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. अशा प्रकारे, सविता प्रधान यांचा हा उल्लेखनीय प्रवास सर्व अडचणींना मात देणारा आणि यशाचा मार्ग शोधणारा आहे