*अमरावती-* मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सोमवारी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर तिखट पलटवार केला. नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ऐकूण मला धमकी देऊ नये. त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. मी फडणवीसांना मोजत नाही. कारण, मराठा समाजाने भलेभले पायाखाली चिरडलेत, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी सोमवारी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, खासदार अनिल बोंडे यांच्यावर निशाणा साधला. विशेषतः त्यांनी यावेळी नाराणय राणे यांना देवेंद्र फडणवीसांचे ऐकूण आपल्या नादी न लागण्याचा सल्ला दिला. नारायण राणे हे फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. मी राणे यांना आव्हान दिले नाही. त्यामुळे त्यांनीही मला धमकी देऊ नये. मी राणे कुटुंबीयांविषयी काहीच बोललो नाही. पण त्यानंतरही ते माझ्यावर निशाणा साधत आहेत. मी स्वतः फडवीसांना मोजत नाही. कारण, मराठा समाजाने भलेभले पायाखाली चिरडले आहेत. राणे आम्हाला जाहीर धमकी देणार असतील, तर आम्हीही त्यांना सोडणार नाही, असे ते म्हणाले.
*एक संधी देतो, नीट शहाणे व्हा*
मी नारायण राणे यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते, म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही त्यांना दादा म्हणतो. तुम्हाला शेवटचे सांगतो, माझ्या नादी लागू नका. जी वळवळची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला पश्चाताप होईल. मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो. नीट शहाणे व्हा, असेही ते यावेळी राणे यांना उद्देशून म्हणाले.
जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, राणे पिता-पुत्रांना दोष द्यायचे काही कारण नाही कारण, हे सर्व देवेंद्र फडवणीस करत आहेत. फडणवीस मराठ्यांच्या काही लोकांना रोज तुकडे फेकतो. मी जातीचे काम करतो म्हणून त्यांनी माझ्यावर हे लोक सोडलेत. त्यांना मराठ्यांमध्ये वाद घडवून आणायचे आहेत. पण त्यांचे ऐकूण जे लोक मला बोलत आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल. त्यांना पळता भुई थोडी होईल.
देवेंद्र फडवणीस सुफडा साफ करण्याच्या दिशेने निघाले आहेत. हे राणेंच्या लक्षात येणार नाही, मी जातीसाठी करतो आणि तुम्ही फडणवीसांसाठी करतात, 96 कुळी मराठे काय असतात हे तरी त्यांना माहिती आहे का? असा सवालही जरांगेंनी यावेळी नारायण राणे यांा विचारला.
*राणेंच्या लेकरांचे हाल नाहीत…*
आम्हला आरक्षण नको, आम्ही 96 कुळी आहेत, याला 96 कुळी म्हणत नाहीत. ज्यांनी 96 कुळी मराठ्यांच्या आई-बहिणींवर लाठीमार केला, त्या फडणवीसांच्या नादी राणे लागलेत. कोणाला शिकवतो रे 96 कुळी आणि 95 कुळी. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे वाटोळे करू नका. राणेंच्या लेकरांचे हाल नाहीत, ते मराठ्यांच्या नावाने खूप मोठे झालेत. त्यांचे परदेशापर्यंत व्यवसाय आहेत, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
त्यांचे ऐश्वर्य मराठ्यांच्या जीवावर आहे. त्यांना आरक्षणची गरज वाटत नाही. पण त्यांनी आमच्या ताटात माती कालवू नये. तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही फडवणीस यांचे ऐकू नका, नाहीतर पळता भुई थोडी होईल. तुम्हाला ही शेवटची संधी देत आहे, असेही मनोज जरांगे यावेळी नारायण राणे यांना इशारा देत म्हणाले.
*अनिल बोंडेंवरही साधला निशाणा..*
मनोज जरांगे खासदार अनिल बोंडे यांच्याविषयी म्हणाले की, तू माझ्या नादी लागू नको. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांचे काम चांगले नाही. यामुळे त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. पण त्यांना आरक्षण देताना कुणीही अडवू नये. फडणवीसी यांनी आमच्या जवळचे लोक फोडले. त्यांनी त्यांना माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यास उद्युक्त केले.