“मनोज जरांगेंची भावना प्रामाणिक होती तेव्हा सरकार सोबत होतं, पण आता…”, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा!..

Spread the love

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलंय का?”

मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सरकारकडून मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मात्र ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षणासाठी ठाम असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. त्याचवेळी सरकारनं घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचाही समावेश केला. मनोज जरांगे पाटील व विरोधकांनी सरकारवर घेतलेल्या आक्षेपांवर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “आज काही लोक म्हणतात की मराठा आरक्षण टिकणार नाही. पण का टिकणार नाही? त्याची कारणं तरी द्या. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे. आरक्षण कसं टिकलं पाहिजे, याच्या सूचना न करता टिकणार नाही असं विरोधक म्हणतायत. पण त्याची कारणंही देत नाहीयेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सगेसोयरेंच्या अधिसूचनेचं काय?..

अधिसूचनेवर आलेल्या हरकतींचा मुद्दा उपस्थित करत यावर मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली. “यात कायदेशीर बाबी पूर्ण करायला हव्यात. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेता येणार नाही. आम्ही कुणालाही फसवणार नाही. त्यामुळे आम्ही टिकणारा निर्णय घेतला आहे. माझं विरोधी पक्षांना आवाहन आहे. आरक्षण दिल्यानंतर त्यात विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. टिकणार नाही असं म्हणून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करतंय? याचा उलगडा जनतेसमोर लवकरच होईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही आमची आहे. त्यामुळे संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे. सरकार कुठे कमी पडतंय हे तर दाखवा. काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं कारस्थान आहे. हे कुणीही करता कामा नये. त्यामुळे कुणीही संभ्रम निर्माण करण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जनता सूज्ञ आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

“जरांगेंच्या मागण्या वारंवार बदलल्या”..

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलल्याचा मुद्दा नमूद केला. “मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यात उतरला आहे अशी आमची पूर्वी भावना होती. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर आम्ही कार्यवाही केली. पण त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या मागण्या आल्या. मागण्या बदलत गेल्या. याआधीही मराठा समाजाचे ५६ मोर्चे झाले. कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही. पण यावेळी कुठे आग लावली, कुठे दगडफेक केली”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली.

“विरोधकांच्या पत्रातलं एक वाक्य मनोरंजक, ते म्हणतात…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!..

“मराठा समाज संयमी आहे. पण त्याला गालबोट लावण्याचं काम जे कुणी करत असेल, त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवं. जरांगे पाटलांची जोपर्यंत मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना होती, तोपर्यंत सरकार त्याच्याबरोबर होतं. मी कधीही इगो ठेवला नाही. पण आत्ताची त्यांची भाषा राजकीय वाटतेय. त्यांच्यामागे कुणीतरी ते सगळं बोलून घेतंय असा वास मला येतोय”, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

“उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलंय का? हे पाहायला हवं. असे खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करत नाही. प्रत्येकानं आपापल्या मर्यादेत राहायला हवं. या प्रकारांमुळे समाजाला त्रास होता कामा नये. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहिती नाही, पण गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कुणी जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही”, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page