पुणे: उच्च शिक्षण व नोकरीत टक्का वाढवायचा असेल तर आरक्षण महत्त्वाचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे आरक्षणा शिवाय पर्याय नाही. सध्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळणार आहे,
मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान कारेगाव रांजणगाव गणपती शिरूर येथे मनोज जरांगे यांची सभा झाली. कडाक्याच्या थंडीतदेखील मोठा जनसमुदाय जरांगे-पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होता. शिरूर तालुक्यात मनोज जरांगे-पाटील यांचे आगमन झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने गावोगावचे नागरिक रस्त्याच्या कडेने गावागावांमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यासाठी उभे होते.
यावेळी जरांगे-पाटील म्हणाले की, सकल मराठा समाजाने मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येकवेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून आहेत. अशीच एकी पुढे राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. समाजाला मी मायबाप मानले आहे. शांततेत आंदोलन केल्याने ते यशस्वी झाले. समाजाला सोडून एकट्याने चर्चा केली नाही. मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही, मराठ्यांची पोरं क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले. एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही, आरक्षणाच्या आड नेते आले तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करू, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले. व्यसनांपासून दूर राहा, असा मोलाचा सल्ला जरांगे यांनी दिला. मनोज जरांगे-पाटील यांनी सकाळी रांजणगाव येथील श्रीमहागणपतीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला.
जाहिरात