मुंबईच्या धर्तीवर लोणावळा-पुणे लोकल सेवा गरजेची

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

लोणावळा : प्रवाशांची तोबा गर्दी, लोकलमध्ये चढताना आणि उतरताना करावी लागणारी तारेवरची कसरत, प्रवासात धक्के खात उभे रहाणे आणि दिवसाढवळ्या वाढती पाकिटमारी या कारणास्तव मुंबईच्या धर्तीवर लोणावळा-पुणे दरम्यानही प्रत्येक दहा मिनिटांना लोकल सुरू करण्याची मागणी सरकारी आस्थापनांमधील कामगार, रेल्वे प्रवासी आणि दैनंदिन प्रवाशांनी केली आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वस्त्यांमधील लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक आहे. परिसरात देहूरोड कॅन्टोन्मेंट, ऑर्डनन्स फॅक्टरी, सीक्युएएसव्ही, केंद्रीय आयुध भांडार, डीएडी डेपो, डीओडी डेपो, एमईएस आदी केंद्रीय सरकारी आस्थापना आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे आदी भागातून रेल्वेने ये-जा करणाऱ्या आस्थापनांतील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेणार्या पाकिटमारांचा सुळसुळाट झाला असून त्यांना लोहमार्ग पोलिसांची भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईच्या धर्तीवर लोकल हव्यात
मुंबईच्या धर्तीवर लोणावळा-पुणे लोकल सुरू केल्यास आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसह दैनंदिन प्रवाशांची सुद्धा चांगली सोय होईल आणि रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. त्यामुळे, दर दहा मिनिटाला लोकल सुरू करण्याची मागणी कॅन्टोन्मेंट आस्थापनेतील अस्मिता नवले, अजय चौधरी व सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश लुनावत, क्रांती सोमवंशी ,ज्योती भालके, पूनम गायकवाड, पौर्णिमा पालेकर, मारुती पवार, अर्चना म्हाळसकर, सोनाली शेलार यांनी केली आहे.

रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान जवळ जादा रक्कम आणि दागिने बाळगू नयेत, ऑनलाइन व्यवहार आणि एटीएमचा उपयोग करावा, अडचणीत सापडलेल्या प्रवाशाला अन्य प्रवाशांनी मदत करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, त्या चोरट्याला पकडून गजाआड करता येते. त्याच्याकडील अन्य गुन्ह्यांची उकल होण्यास निश्चितच मदत होते.
– शुभांगी नलवडे, महिला पोलिस शिपाई, लोहमार्ग पोलिस, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन चौकी

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page