कार्तिकी एकादशी 2024: विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात संपन्न, यंदा मानाचे वारकरी ठरले ‘हे’ दाम्पत्य…

Spread the love

आज कार्तिकी एकादशी…या निमित्तानं आपल्या लाडक्या ‘विठूमाऊली’च्या दर्शनासाठी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi 2024) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आज (12 नोव्हेंबर) श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर तसंच मानाचे वारकरी यांच्या हस्ते पार पडली. विठ्ठल-रुक्मिणीच्या या महापूजेत यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर मानाचे वारकरी ठरले.

सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी : शासकीय महापूजेदरम्यान उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून भाविकांची निवड करण्यात आली. मानाचे वारकरी ठरलेले सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दोन मुलं, दोन मुली आणि नातवंडं असं त्यांचं कुटुंब असून गेल्या 14 वर्षांपासून ते नियमितपणे वारी करत आहेत. दरम्यान, मानाचा वारकरी निवड करण्याची प्रक्रिया व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, राजाराम ढगे यांनी पार पाडली.

कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा नेहमी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. परंतु, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडली. शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समिती मार्फत होणारी श्री विठ्ठल-रुक्मिणीची पाद्यपुजा आणि नित्यपुजा अनुक्रमे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते संपन्न झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page