कोराडीची जगदंबा माता: दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका…

Spread the love

नागपूरजवळील कोराडी इथं आदिमाया जगदंबा देवीचं जागृत मंदिर असल्याची भाविकांची धारणा आहे. कोराडी जगदंबा मंदिर विदर्भात सुप्रसिद्ध आहे. जाखापूरचा राजा झोलन याला कन्या नसल्यानं त्यानं जप तपांनी देवांना प्रसन्न करुन कन्यारत्न मागितलं. यावेळी आदिमाया जगदंबा अवतरल्याची अख्यायिका सांगितली जाते. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी घेतलेला हा खास आढावा.

नागपूर : आजपासून आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं विदर्भात प्रसिद्ध असलेल्या कोराडीच्या जगदंबा मातेची आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत. नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची महालक्ष्मी जगदंबा देवी प्रसिद्ध आहे. पूर्वी कोराडी जाखापूर या नावानं ओळखलं जायचं. जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते. जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु एकही कन्यारत्न नसल्यानं राजा दु:खी होता. त्यानं यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करुन देवाना प्रसन्न केलं आणि एक कन्यारत्न मागितलं. दिव्य, पवित्र, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं आदिमाया जगदंबा देवी अवतरली. गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेल्या आदिमाया जगदंबा देवीची अनेक दिव्य अनुभूती राजाला येई. एका युद्धप्रसंगी आदिमाया जगदंबेनं राजाच्या शत्रुविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचं दर्शन घडवलं. झोलन राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली, ते ठिकाण म्हणजे जाखापूर, साक्षात शक्तीपीठ.!

जगदंबा माता कोराडी मंदिराचं हेमाडपंथी बांधकाम-

महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी हे नागपूरच्या उत्तरेस जवळपास 15 किमी अंतरावर आहे. कोराडी देवी मंदिर परिसराचं अगोदरच्या काळी ‘जाखापूर’ हे नाव होतं. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी होते.

कोराडीची जगदंबा माता-

दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा काय आहे झोलन राजा आणि जाकुमाईची अख्यायिका : झोलन राजाच्या पत्नीला म्हणजेच राणी गंगासागर यांना कन्यारत्न झालं. कन्येचा जन्म होताच नगरातील प्रजा खूप आनंदी झाली. जिकडं तिकडं उत्सव साजरे केले जात होते. राजकन्येला बघण्यासाठी आल्यानंतर आईची स्वर्णीम कांती, उज्ज्वल तेज, सौम्य हास्य, अत्यंत आकर्षक मुखमंडळ, तेजस्वी डोळे, आकर्षक कान, भव्य मस्तक असं कन्येचं रुप पाहून राजाचे नेत्र दीपक होते. राजाला असं वाटलं की कन्या नसून दिव्यशक्ती आपल्या घरी मुलीच्या रुपानं अवतरली आहे. नंतर शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणं आई जाकुमाई वाढू लागली. त्यांचं सर्वतोमुखी दिव्य तेज आणि सुंदरता याची राजवाड्यात चर्चा होऊ लागली.

किराडच्या राजानं घातली लग्नाची मागणी-

झोलन राजाच्या नगराच्या सीमेपलीकडील भागामध्ये किराड राजाची नगरी होती. किराड राजाच्या कन्येनं जंगलात फिरत फिरत मैत्रिणी सोबत आणि काही निवडक सैन्यासोबत झोलन राज्याच्या नगरात प्रवेश केला. राजाच्या सैनिकांनी अनोळखी व्यक्ती आपल्या सीमेत आलेली पाहून राजासमोर आणलं. तेव्हा झोलन राजाची कन्या जाकुमाई राजदरबारात उपस्थित होती. झोलन राजानं सर्व विचारपूस केल्यानंतर सन्मानानं त्याच्या नगरीत पाठवून दिलं. तेव्हा किराड राजाच्या कन्येनं झोलन राजाची मुलगी, तिचं अप्रतिम सौंदर्य आपल्या वडिलांना सांगितलं. किराडच्या राजानं झोलन राजाच्या मुलीला आपल्या मुलांसाठी मागण्याचा मनात विचार केला. त्याबाबत राजानं दुतामार्फत संदेश पाठवला.

जाकुमाईनं ठोकरली राजाची मागणी-

मात्र झोलन राजानं हा प्रस्ताव नाकारला. नंतर किराड राजाला संताप आला आणि रागाच्या भरात त्यानं झोलन राजाला दूत पाठवून युद्धासाठी तयार होण्यास सांगितलं. अन्यथा मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणला. प्रस्ताव ऐकल्यानंतर राज्यसभेत जाकुमाईनं दूताला सांगितलं की, आम्ही युद्धासाठी तयार आहोत. असं म्हणताच त्या क्षणी झोलन राजा जाकुमाईकडं पाहतच राहिले. झोलन राजाला हे माहिती होतं, की ही दैवशक्ती आहे. त्यामुळे राजाला जाकुमाईच्या प्रस्तावाला दुजोरा दिला.

जाकुमाईनं केलं रणभूमीकडं कूच-

ठरल्याप्रमाणं युद्धाचा दिवस निश्चित झाला. झोलन राजाची सेना सर्व अस्त्रशस्त्रानिशी हत्ती, घोडे, रथ, पालखी आणि सुसज्ज करुन सेनापती राजवाड्यासमोर उपस्थित होते. जाकुमाईनं झोलन राजाचं दर्शन घेऊन आई गंगासागर यांचा सुद्धा आशीर्वाद घेतला. वडिलांची आज्ञा जाकुमाई युद्धास निघाली. आई जाकुमाई स्वतः हत्तीवर बसून हातामध्ये त्रिशूल, डमरू, तलवार, धनुष्य आदी शस्त्रं घेऊन स्वार होती. तिनं रणभूमीकडं कूच केलं. आई जाकुमाई समोर आणि तिची सर्व सेना मागं होती.

किराड राजाला दिलं जीवनदान-

दोन्ही सेना समोरासमोर धडकल्या. भयंकर युद्ध झालं. शेवटी किराड राजाचा पराभव झाला. राजा आईच्या चरणी लोटांगण घालत होता. दयेची भीक मागत होता. आईनं किराड राजाला जीवनदान दिलं. पण आई जाकुमाई दैवीशक्ती असल्यामुळे झोलन राजाच्या दरबारात परत गेली नाही. ज्या कामासाठी अवतार घेतला होता, त्या किराड राजाला आणि सेनापतीला शिक्षा दिली. मात्र त्यानंतर आई ज्या ठिकाणी सूर्य अस्त होईल, त्या ठिकाणी मी थांबेल, असं म्हणून सर्व सेना आणि सेनापती यांना झोलन राजाच्या दरबारात परत पाठवलं. नंतर आई रस्त्यानं निघाली. सूर्य मावळल्यानंतर ज्या ठिकाणी आई विराजमान झाली, ते ठिकाण म्हणजे ‘जाखापूर’, अशी अख्यायिका सांगितली जाते.

किराड यात्रेची अशी आहे परंपरा-

जाखापूरमध्ये चैत्र आणि अश्विन महिन्यात वर्षातून दोनदा जत्रा भरते. आताही आईची तीन रुपं साक्षात दररोज भक्तांना दर्शन देतात. वर्षातून आईचं विशेष दर्शन ज्या स्वयंभू साक्षात स्वरुपात आहे, ते दर्शन चैत्र महिन्यात होते. तसेच अश्विन प्रतिपदेच्या दिवशी या स्वयंभू मूर्तीचं दर्शन भक्तांना होत असते. यावेळी अफाट गर्दी असते. देवीच्या पूजेचा मान वंशपरंपरेनुसार फुलझले परिवाराकडं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page