लखनौ :- ज्ञानवापी प्रकरणानंतर आता आणखी एका प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. महाभारतात उल्लेख असलेल्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील ‘लक्षगृह’ च्या १०० बिघा जमिनीवर अतिक्रमण केल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. बद्रुद्दीन शाहची मजार आणि लक्षगृह वादातील ५० एकर जमीन एडीजे कोर्टाने हिंदू पक्षाला दिली. गेल्या ५३ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होते.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा गावातील एका प्राचीन टेकडीवर वसलेल्या, सुफी संत बदरुद्दीन शाह यांची समाधी तसेच कब्रस्तान असलेल्या जागेवरून दीर्घकाळ विवाद होता. १९७० मध्ये ही बाब पहिल्यांदा उघडकीस आली, जेव्हा मुकीम खान नावाच्या एका व्यक्तीने लक्षगृह बदरुद्दीन शाहची कबर आणि कब्रस्तान असल्याचा दावा केला होता.
पांडवांना मारण्यासाठी बांधले होते लक्षगृह
हे स्थळ सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित आहे. १९७० मध्ये मुकीम खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यामध्ये हिंदूंना जमिनीवर अतिक्रमण करणे, कबरी नष्ट करणे आणि हवन आयोजित करण्यापासून रोखावे, अशी मागणी केली. शिवाय लक्षगृह बदरुद्दीन शाहची कबर आणि कब्रस्तान असल्याचा दावा केला होता. त्यावेळी स्थानिक पुजारी कृष्णदत्त महाराज यांना या खटल्यात प्रतिवादी करण्यात आले होते. हिंदू बाजूने दावा केला की या जागेवर ‘लक्षगृह’ आहे, जो दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्याच्या भयंकर योजनेसाठी बांधलेला ‘लाख’ चा महाल आहे. या प्रकरणात सुमारे ५० एकर जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात प्रकरण सुरू होते. हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला व पुरावेही सादर करण्यात आले.
हिंदू बाजूचे वकील काय म्हणाले ?
हिंदू बाजूचे वकील रणवीर सिंग तोमर म्हणाले की, “३२ पानांच्या न्यायालयाच्या आदेशात मालमत्तेवरील फिर्यादीच्या दाव्यांमध्ये स्पष्ट त्रुटी आढळल्या आहेत. मुस्लिम बाजूने असा दावा केला की सूफी संताची कबर ६०० वर्षे जुनी आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर, एक कब्रस्तान देखील तयार झाले, ज्याला त्या काळातील ‘शाह’ यांनी वक्फ मालमत्ता केली होती, परंतु ते शासकाचे नाव देऊ शकले नाहीत. खरे तर सरकारी नोंदींमध्ये स्मशानभूमीचा उल्लेख नाही.
न्यायालयाकडून ‘त्या’ राजपत्राची दखल
न्यायालयाने १२ डिसेंबर १९२० च्या अधिकृत राजपत्राची दखल घेतली, जे प्रतिवादींनी सादर केले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, “शहराच्या दक्षिणेला ‘लाख मंडप’ नावाचा लहान टीला आहे. सरधना तहसीलमधील मेरठपासून उत्तर पश्चिम १९ मैलांवर असलेल्या बर्नावा येथे पांडवांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता.” १९२० मध्ये वादग्रस्त जागा वक्फ मालमत्ता आहे की कब्रस्तान आहे हे मुस्लिम बाजू स्थापित करू शकत नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
५४ एकर जागेवर पांडवकालीन बोगदा
बर्नावा येथील लक्षगृह येथे असलेल्या संस्कृत शाळेचे प्राचार्य आचार्य अरविंद कुमार शास्त्री म्हणतात की, “हा ऐतिहासिक ढिगारा महाभारत काळातील लक्षगृह आहे. वादग्रस्त ५४ एकर जागेवर पांडवकालीन बोगदा आहे. या बोगद्यातून पांडव लक्षगृहातून पळून गेल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी सर्वाधिक उत्खनन झाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.”
लक्षगृहाचा उल्लेख महाभारतातही
१९५२ मध्ये एएसआयच्या देखरेखीखाली उत्खनन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक दुर्मिळ अवशेषही सापडले होते. येथे उत्खननादरम्यान ४५०० हजार वर्षे जुनी भांडी देखील सापडली होती. जी महाभारत काळातील असल्याचे सांगितले जाते. लक्षगृहाची कथा महाभारतातही वर्णन केलेली आहे. दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्याची योजना आखली होती. त्याच्या मंत्र्याकडून त्यांनी हे लक्षगृह बांधून घेतले होते.
जाहिरात