संसदेत जाणं म्हणजे रस्त्यावर डांबर टाकण्याइतकं सोप्पं आहे काय ?

Spread the love

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या जो तो उठतोय आणि संसदेत जाण्याचं स्वप्न बघत आहे. स्वप्न बघायला हरकत नाही. पण ते स्वप्न बघताना आपली पात्रता काय? आपला अभ्यास काय? आपले शिक्षण काय? याचा विचार म्हणजे आत्मचिंतन करायला नको काय ? रत्नागिरी सिंधूदुर्ग लोकसभा मतदासंघाला एक परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधुभाई दंडवते, सुरेश प्रभू, निलेश राणे ही परंपरा पाहता विनायक राऊत या परंपरेप्रमाणे वागत आहेत. सोज्वळ, सुसंस्कारी परंपरेत भाजपला तोडीसतोड असा उमेदवार देणं गरजेचं आहे. किमान संसदेत आपल्या भागातील प्रश्र्नावर आवाज उठवता येईल, असा उमेदवार हवा. अर्थात ठेकेदार असायला हवा, हे बंधन तरी इथे नको. कारण पूर्वीच्या परंपरेप्रमाणे पाहता इथे एक व्हिजन असलेला उमेदवार हवा. भाजपकडे नारायण राणे, प्रमोद जठार, बाळासाहेब माने, राजन तेली, निलेश राणे, रवींद्र चव्हाण असे मात्तब्बर नेते खासदार होतील असे अभ्यासू, सुशिक्षित आणि मतदारसंघाची जाण असणारे उमेदवार आहेत. यात प्रमोद जठार, बाळासाहेब माने यांचा विचार होणे गरजेचे आहे. निलेश राणे, रवींद्र चव्हाण, आणि नारायण राणे इच्छुक नसतील तर जठार आणि माने सोबत तेली यांना उमेदवारी मिळायला हवी. जठार, माने, तेली यांना आमदारकीच्या कामाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला आणि मोदी सरकारलाही होईल. पण नवखा उमेदवार देऊन भ्रमनिरास करण्यात काय अर्थ ?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जो भाग येतो, त्या भागाचं १९५७ ते १९७१ या काळात समाजवादी नेते नाथ पै आणि १९७१ ते १९९१ या काळात समाजवादी नेते मधु दंडवते यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही १९९६ ते २००९ या काळात या भागातून चारवेळा खासदार म्हणून निवडून येत शिवसेनेचं संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे. इथवर म्हणजे २००९ पर्यंत या मतदारसंघाचं नाव ‘राजापूर’ होतं. २००८ साली पुनर्रचनेनंतर ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असं नामकरण झालं आणि नव्या नावासह झालेल्या २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव करत, काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे हे खासदार बनले. नाथ पै आणि मधु दंडवते यांच्या सारख्या व्रतस्थ राजकारण्यांचा या मतदारसंघाला वारसा आहे. हा वारसा जपण्याचा प्रयत्न आजतागायत होत आहे. अगदी विनायक राऊतही तसा प्रयत्न करत आहेत. किमान संसदेत बोलताना तरी आपण पाहत आहोत. विनायक राऊत उपयोगी नसले तरी उपद्रवी नाहीत. मात्र आता जे गुडघ्याला बाशिंग बांधून संसदेत जाण्यासाठी बॅनरबाजी करत आहेत. बॅनरवर केंद्रीय मंत्री झाल्याची स्वप्न रंगवीत आहेत, त्यांना संसदेत जाणं म्हणजे सोप्पं वाटत आहे काय? संसदेत जाणं म्हणजे रस्त्यावर डांबर टाकण्याइतकं सोप्पं आहे काय ? भाजपकडे नारायण राणे, प्रमोद जठार, बाळासाहेब माने, राजन तेली, निलेश राणे, रवींद्र चव्हाण असे मात्तब्बर नेते खासदार होतील असे अभ्यासू, सुशिक्षित आणि मतदारसंघाची जाण असणारे उमेदवार असताना कुणाच्यातरी स्वप्नरंजनासाठी आपले कमळ पायदळी तुडवण कसे जमेल ? भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने याची दखल घेऊन कट्टर, कडवट आणि मूळच्या भाजपच्या मुशितील उमेदवाराला बाशिंग बांधायला हवे, हा कल भाजपच्या मतदारांचा आहे.

२००८ साली या लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला. आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात २००९ सालापर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे लोकसभा मतदारसंघ होते. २००८ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेतून या तीन मतदारसंघांचे ‘रायगड’ आणि ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असे दोन मतदारसंघ तयार झाले. यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या भूभागावरील या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात. या मतदारसंघातल्या सहा विधानसभा जागांपैकी तीन रत्नागिरी जिल्ह्यात आणि तीन सिंधुदुर्गात येतात. शिवसेनेची ताकद असलेल्या या मतदारसंघात होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानं पक्षात फूट पडल्यानं शिवसेनेची ताकदही ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागली गेलीय. दुसरीकडे, भाजपची ताकद नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशानं वाढली आहे. भाजप प्लस असताना शांत आहे पण शिंदे गट मायनस असताना दावा करत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत गेल्या काही निवडणुकांमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते. मात्र, २००९ साली निलेश राणेंचा विजय वगळता काँग्रेसलाही तिथं काही लक्षणीय कामगिरी करता आली नाहीय. मात्र, यावेळी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत असल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत हेच महाविकास आघाडीचे २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसही जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडून, विनायक राऊतांना समर्थन करण्याची शक्यता अधिक आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे चित्र असताना, या दोन्ही गटाची आताची स्थिती कशी आहे, हेही आपण पाहूया.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत, तर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप हे तीन पक्ष महायुतीत आहेत. गेल्या दोन-तीन दशकांपासून कोकणातल्या या भागात शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला दिसतो. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेच्या ताकदीला तडा गेलाय. त्यात लोकसभेची जागा एकनाथ शिंदे शिवसेनेकडे राखतात की भाजप या जागेवरून लढते, यावरही त्यांच्या जय-पराजयचं गणित अवलंबून असेल. भाजपला अच्छे दिन हे उमेदवार कोण असेल यावर येतील. अभी नही तो कभी नहीं या मोडवर भाजप कार्यकर्ते आहेत. आता फक्त निष्ठा की प्रतिष्ठा यावर गणित अवलंबून आहे. विनायक राऊत यांचा पेपर भाजप सोप्पा करते की अवघड करते, हे पाहण्यासारखे असेल. सध्यातरी उतावळे उमेदवार आणि गुडग्याला बाशिंग अशी स्थिती आहे. अर्थात ही स्थिती शिंदे गटाची जास्त आहे. त्यामानाने भाजप सायलेंट मोडवर आहे. अर्थात हा सायलेंट मोड म्हणजे वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ? हा सवाल आहे.

तूर्तास जय श्रीराम !

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page