
रत्नागिरी, दि. 7 (जिमाका) : राजापूर येथे महामार्गानजिक होणाऱ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलला 15 ऑगस्ट पूर्वी शासनाकडून मंजुरी मिळेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज वाटुळ येथील संभाव्य सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसिलदार शीतल जाधव, राहुल पंडित, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
जागेची पाहणी करताना सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरु ठेवावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सुपरस्पशालिटी हॉस्पीटलला 25 पैकी 5 एकर जागा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांनी पाठपुरावा केला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त रंगा नायक यांच्याकडे सध्या हा प्रस्ताव आहे. अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे तो जाईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून 15 ऑगस्ट पूर्वी त्यास मंजुरी मिळेल. राजापूरकरांच्या दृष्टीने हे हॉस्पीटल अतिशय महत्वाचे आहे.
राजापूर येथील विश्रामगृहासाठी 3 कोटी मंजूर केले आहेत. त्याचबरोबर नव्याने होणाऱ्या कम्युनिटी सेंटरसाठी 2 कोटी दिले जातील. त्याचेही काम तात्काळ निविदा काढून केले जाईल. 26 कोटी 68 लाख रुपये तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 14 कोटी 78 लाख रुपये राजापूरच्या विकासासाठी दिले आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले.