रत्नागिरीत भर पावसात सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा..

Spread the love

७ जुलै/रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी भागात गुरुवारी गो वंश हत्येचा प्रकार उघडकीस आला. ४८ तासांत आरोपीला अटक होऊ शकली नसल्याने दोन दिवस वातावरण ढवळून निघाले आणि सकल हिंदू समाजाने आज रविवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चा काढला. भर पावसात मोर्चा निघाला. माजी खासदार नीलेश राणे यांच्यासमवेत सर्वच राजकीय पक्षांचे हिंदू कार्यकर्ते यात सहभागी झाले. चर्चा, नंतर रास्ता रोको असे आंदोलन चिघळत गेले. पण पोलिसांनी काल ताब्यात घेतलेल्या संशयिताला न्यायालयासमोर हजर केले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी सक्षम अधिकारी नेमून एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले.

गो वंश हत्या प्रकरणावरून हिंदू समाजाने पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सकल हिंदु समाजाने दोन दिवस ग्रामीण पोलिस ठाण्यावर धडक मारली. पोलिसांशी चर्चा केली, माहिती घेतली. परंतु आरोपीला अटक होत नसल्याने सकल हिंदु समाजाने जाब विचारू आंदोलनाचा निर्णय घेतला. जोरदार पाऊस असूनही हजारो हिंदु बंधू-भगिनी मोर्चात सहभागी झाले होते.

गो सेवा ही गोपाळ सेवा, गो हत्या को बंद करेंगे ये संकल्प हमारा है, जय श्रीराम, जयजय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. हा मोर्चा जेल रोडवरून पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ पोहोचला. त्यावेळी आम्ही चर्चेला कार्यालयात जाणार नाही, आरोपींना मोक्का लावला पाहिजे, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजेत, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सकल हिंदु समाजाशी संवाद साधला. आरोपीला न्यायालयात नेऊन हजर करा, या मागणीवर हिंदु कार्यकर्ते ठाम राहिले. चर्चा झाल्यानंतर जेल रोड नाक्यावर मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आले. आंदोलक भजने म्हणत होते व घोषणाबाजीने वातावरण भगवेमय झाले.

गो वंश हत्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आठ पथके तपास करत आहेत. सीसीटीव्हीद्वारे तपासून माहिती घेतली जात आहे. आम्ही कोणालाही पाठीशी घातले नाही. गो वंश तस्करी करणाऱ्यांची माहिती दिली तर कारवाई करू, तसेच यात कोणी पोलिस कर्मचारी सामील असल्यास त्याचे निलंबनच नव्हे बडतर्फ करू असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page