136 वर्षांचा विक्रम मोडीत, पर्थमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; ऑस्ट्रेलियाचा चौथ्या दिवशी खेळ खल्लास…

Spread the love

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात, भारतीय क्रिकेट संघानं संपूर्णपणे वर्चस्व राखत पहिला सामना जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

पर्थ : येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात, भारतीय क्रिकेट संघानं संपूर्णपणे वर्चस्व राखत पहिला सामना जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर भारतानं पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. भारताचा कांगारुंच्या धर्तीवर मिळवलेला हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे.

पर्थमध्ये कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पराभव :

ऑस्ट्रेलियन संघ पर्थ स्टेडियमवर आतापर्यंत अपराजित होता. या मैदानावर ऑस्ट्रेलियानं यापुर्वी 4 कसोटी सामने खेळले होते. यात ऑस्ट्रेलियानं हे सर्व जिंकले होते. मात्र या सामन्यात त्यांना भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. तसंच पर्थच्या या मैदानावर भारतीय संघाचा हा पहिलाच विजय आहे. त्यांनी यापुर्वी 2018 मध्ये भारतानं या मैदानावर सामना खेळला होता. मात्र त्या सामन्यात भारताला पराभवाचा समना करावा लागला होता.

भारतानं रचला इतिहास :

विशेष म्हणजे या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांपर्यंत मर्यादित राहिला होता, पण त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि विराच कोहलीनं शतकी खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. परिणामी भारतानं 487 धावांवर डाव घोषित केला. यासह भारतीय संघानं एक ऐतिहासिक कामगिरी देखील केली होती जी आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही करु शकला नव्हता.

भारतानं दिलं हिमासयाइतकं लक्ष्य :

पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी दिसून आली ज्यात पहिल्या विकेटसाठी 201 धावांची ऐतिहासिक भागीदारी पाहायला मिळाली. केएल राहुलनं 77 धावांची खेळी खेळली, त्यानंतर यशस्वी जैस्वालनं कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक झळकावलं आणि 161 धावांची उत्कृष्ट खेळी त्याच्या फलंदाजीत पाहायला मिळाली. यानंतर विराट कोहलीलाही बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आलं. कोहलीनं 143 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं लक्ष्य देण्यात यशस्वी ठरली असतानाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 500 हून अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

136 वर्षाचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाचा पराभव :

पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करताना त्यांनी अवघ्या 29 धावांत त्यांचे आघाडीचे 4 विकेट गमावले. याचाच परिणाम असा झाला की हा 136 वर्षे जुना विक्रम मोडला गेला. यापूर्वी 1888 साली मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे चार आघाडीचे फलंदाज 38 धावांत बाद झाले होते.

भारतीय गोलंदाजांच्या कहरामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ 238 धावांत गारद :

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडनं सर्वाधिक 89 धावा केल्या. त्याच्याशिवाय मिचेल मार्शनं 47 धावांची खेळी केली. पण भारतानं ऑस्ट्रेलियासमोर उभारलेल्या धावसंख्येसारखा डोंगर चढण्यासाठी हे पुरेसं नव्हतं. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कहरानंतरही ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात केवळ 238 धावा केल्या. भारताकडून बुमराहनं 8 विकेट घेतल्या. तर सिराजनं 5 आणि राणानं 4 बळी घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page