हरारे- अखेरच्या पाचव्या टी-20 सामन्यात शुभमन गिलच्या युवा ब्रिगेडने झिम्बाब्वेचा धुराळा उडवला. पाचव्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्याची टी20 मालिका 4-1 ने जिंकली. झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात विजय मिळवत शानदार सुरुवात केली होती, पण त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत पलटवार केला. भारताने लागोपाठ चार टी-20 सामने जिंकत मालिका खिशात घातली.
अखेरच्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसन यानं वादळी अर्धशतक ठोकले. त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्याशिवाय शिवम दुबे यानं अष्टपैलू खेळी केली. फलंदाजीत झटपट 25 धावा केल्या, त्यानंतर गोलंदाजीत दोन विकेट घेतल्या. अष्टपैलू खेळी करणाऱ्या शिवम दुबे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबेने पाच सामन्यात आठ विकेट घेतल्या. संजू सॅमसनच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 167 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल झिम्बाब्वेला फक्त 125 धावांपर्यंतच मजल मारता आली. संजू सॅमसनने 45 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये मुकेश कुमारने चार विकेट घेतल्या, तर शिवम दुबे याने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
झिम्बाब्वेकडून डिओन मायर्स आणि मारुमणी यांनी दमदार फलंदाजी केली, त्यांच्याशिवाय कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. अखेरच्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना आज चांगली सुरुवात देता आला नाही. ठरावीक अंतराने भारताने विकेट फेकल्या. संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 66 धावांची भागीदारी करत डाव सावरला. यजमान झिम्बाब्वे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा वेस्ली मधवेरे शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. कर्णधार सिकंदर रझा यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 8 धावांवर धावबाद झाला. मायर्स या मालिकेत चांगली फलंदाजी करताना दिसला. पण संघाला विजय मिळून देऊ शकला नाही. मारुमणीने 24 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले तर मायर्सने 32 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. त्यांच्या 44 धावांच्या भागीदारीमुळे झिम्बाब्वेच्या विजयाची आशा निर्माण झाली.