रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. आज रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरल आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर दुसरीकडे संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.
गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडीतील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर तिकडे दापोली तालुक्यातील पालगड पवारवाडी येथील पूल पूर्ण पाण्याखाली गेला आहे.
दरम्यान चिपळूण शहरात चार वाजण्याच्या सुमारास नाईक कंपनीजवळ वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५.२४ मी आहे. वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. कोळकेवाडी धरणाच्या मशीन बंद आहेत. दुपारी ४ः४१ वा भरती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. NDRF, नगरपालिका, महसूल व पोलिसांच्या टीम तैनात ठेवलेल्या आहेत. पावसाचा जोर कमी असला तरी नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आवाहन चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केलं आहे. रविवारी सकाळपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातल आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे हे खेड शहरातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून असून खेड नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.