‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’सह काळा घोडा कला महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी – पर्यटनमंत्री गिरीश महाजन..

Spread the love

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’सह काळा घोडा कला महोत्सवाचे उद्घाटन..

मुंबई, दि. २० : राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनारा ऐतिहासिक गड-किल्ले, अजिंठा, वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, जैवविविधतेने समृद्ध वने, तेथील वन्य प्राणी, धार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीतर्फे आयोजित ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आणि काळा घोडा कला महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी क्रॉस मैदान गार्डन, चर्चगेट येथे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक ब्रिंदा मिलेकर, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेता आदिनाथ कोठारे, एक्झिम बँकेच्या हर्षा भंडारी, तरुण शर्मा आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले. त्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देतानाच त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई शहराची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील खाद्यसंस्कृतीला चालना मिळणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, मुंबई फेस्टिवलची मूळची संकल्पना माझी होती. दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई फेस्टिव्हल उत्कृष्टपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई फेस्टिवल समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले की, मुंबई फेस्टिवलच्या आयोजनात राज्य शासनाने पूर्णपणे सहकार्य केले. धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. मुंबई शहर एक उत्सव आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून मुंबईत विविध पायाभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक श्रीमती मिलेर म्हणाल्या की, गेल्या २५ वर्षापासून काळा घोडा महोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई शहरात अनेक एतिहासिक वास्तू आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरवातीला शारदा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच मुंबई फेस्टिव्हलवर आधारित गीत सादर करण्यात आले. संगीतकार श्री. टंडन यांनी संगीत दिले आहे, तर नृत्य दिग्दर्शन रेमो डिसुझा यांनी केले आहे. याशिवाय संगीतकार अशोक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गीते आणि नृत्य सादर करण्यात आली. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री मिनी माथूर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page