चिपळूण l 09 ऑगस्ट- चिपळूण-कराड रेल्वे मार्ग, ठाणे मेट्रो मुंबईतील फनेल झोन, समुह विकास, विकास कामांच्या प्रकल्पांबाबतचे मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीत मांडले. वैशिष्टये म्हणजे या बैठकीमध्ये चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मांडला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्याकडे केली.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा चिपळूण- कराड रेल्वे मार्ग व्हावा म्हणून गेली अनेक वर्षे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून रेल्वेमंत्र्यांपर्यंत पत्र व्यवहार करण्यात आला होता. याचा पाठपुरावा आजतगायत सुरु ठेवण्यात आला आहे. विशेष वैशिष्टये म्हणजे चिपळूण-कराड रेल्वेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पोहचला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शौकतभाई मुकादम यांनी म्हटले आहे.
विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकरण न येता चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सर्वांना बरोबर घेवून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास काही प्रमाणात बेरोजगार तरुणांचा नोकरीचा प्रश्नही मार्गी लागेल व उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. महाराष्ट्रामध्ये मोठ-मोठे प्रकल्प मार्गी लागले, पण चिपळूण-कराड हा १०० कि.मी.रेल्वे प्रकल्प मार्गी लागावा अशा प्रकारचा पाठपुरावा आपण करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.