
रत्नागिरी :- ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही श्रमदानातून २,४९१ बंधारे बांधण्यात आले असून, त्यामध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.
उशिरापर्यंत पाऊस पडल्याने बंधारे बांधण्याचे काम काहीसे लांबणीवर पडले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईही लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून तेथे पाणी साठवले जात आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. त्यामध्ये कच्चे, वनराई आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ८ हजार ६६५ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एप्रिल, मे महिन्यांत कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणीपातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णत: कोरड्या पडतात. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, गावागावांत, वाड्यावाड्यांमध्ये बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबण्यास मदत होते. चालू वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात श्रमदानातून ९९४ कच्चे बंधारे, १०३२ विजय बंधारे आणि ४६५ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होते.
तालुकानिहाय बंधाऱ्यांची संख्या, तालुका – बंधारे.
मंडणगड – १६१
दापोली – ५७१
खेड – ८२
गुहागर – १५०
चिपळूण – ५२५
संगमेश्वर – ४०५
रत्नागिरी – २५२
लांजा – २२३
राजापूर – १४५.