मुंबई- हरियाणातील विजयामुळे बळ मिळालेल्या महायुतीने महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी संपूर्ण २८८ मतदारसंघांत विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी दिली.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बूथ स्तरापर्यंत प्रभावी नियोजन करत समन्वय साधण्याची जबाबदारी या समन्वयकांची असेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार, दिशाभूल, फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची मते मिळवली होती. मात्र आता त्यांच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना देसाई म्हणाले की, बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणे आणि राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आणि सत्ता स्थापन केल्यानंतर महायुतीचा नेता कोण होणार हे आमचे तीन शीर्ष आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ठरवतील. उमेदवार निवडीचा निर्णय तीन पक्षांतील प्रमुख नेते घेणार आहेत, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
सीएमपदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई नाही : देसाई
ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी महायुतीकडे सातत्याने मागणी करत आहेत. जाहीर सभेत,जाहीर मेळावात किंवा बंद खोलीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते नेते करत आहेत. पण, त्यांना (ठाकरे गटाला) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची जितकी घाई आहे, महायुतीत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाला तितकी घाई नाही, असा टोला देसाई यांनी लगावला. त्यानंतर लगेचच भाजपचे प्रवक्ते आमदार प्रसाद लाड यांनीही आम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करण्याची घाई नाही, असे सांगितले.