कोकण हे माझे घर समजतो; रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे देशात आर्थिक सबळ जिल्हे होण्यासाठी प्रयत्न करणार..

Spread the love

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे देवरूख येथील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन

देवरूखमधील महायुतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

देवरूख- कोकण हे माझे घर समजतो. मी कोकणातील आहे. कोकणात येताना मी भावूक होतो. कोकणात आल्यावर तुम्ही जो मला मानसन्मान देता तो माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कोकण समृध्द व्हावे यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे देशात आर्थिक सबळ जिल्हे व्हावेत, ही आपली मनापासूनची इच्छा असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवरूख येथे आज सोमवारी केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटावर घणाघात केला.

महायुतीचा संंगमेश्वर तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात आज सोमवारी सायंकाळी पार पडला. या मेळाव्यात बोलताना ना. राणे म्हणाले कि, जगामध्ये तरूण देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपल्या भारत देशाला विकसीत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गेल्या १० वर्षात मोदीजींनी जगात विकसीत देश म्हणून आपल्या भारत देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. जगातील विकसीत देशामध्ये आपल्या भारताला मोदीजींनी पाचव्या क्रमांकावर आणले आहे. कोरोनाकाळात मोदीजींनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. ८ कोटी लोकांना नळाने पाणी दिले. पावणे चार कोटी गरीबांना पक्के घर बांधून दिले. नेत्याला डोळसपणा लागतो. तो मोदीजींकडे आहे. म्हणूनच आपला भारत देश प्रगती करत आहे. असे ना. राणे म्हणाले.

मला पदांची हाव नाही. कोकणातील माझ्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन मला करायचे आहे. तरूण-तरूणींनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. तुमच्या जीवनात बदल करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. यासाठी तुम्ही मला आपली सेवा करण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत, असे ना. राणे यांनी शेवटी म्हटले. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले कि, सदानंद चव्हाण आणि मी त्यावेळी विरोधी लढलो असलो तरी एका चांगल्या कामासाठी आता एकत्र आलो आहोत. आम्हाला निवडून द्या आम्ही सेवक म्हणून आपले सदैव काम करू अशी ग्वाही देण्याबरोबरच प्रत्येकाने एकजनसी व्हा एक जीव होऊन काम करुया आणि महायुतीला मताधिक्य देऊया. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला विकास अजूनही करता येईल असे म्हणत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी तालुक्या एवढा तरी निधी आम्हाला द्यावा असे सूचित केले.

तर पालकमंत्री उदय सांमत म्हणाले कि, महायुती हे आता कुटुंब म्हणून काम करत असताना एका मेळाव्याची गरज होती. म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. होणाऱ्या मतदानाच्या ७० टक्के मतदान नारायण राणे यांना होईल. ज्याप्रमाणे आमदार शेखर निकम यांनी पायाला भिंगरी लावली आहे त्यानुसार ते नक्कीच आमच्यापेक्षा जादाचे मताधिक्य देतील यात संदेह नाही. पण तुम्ही मताधिक्य दिलेत म्हणून मी काही नाराज होणार नाही उलट तुम्हाला डीपीडीसी मधील जास्त निधी माझ्याकडून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. मी वर्षभर बघतोय आम्ही गुवाहाटीला गेलो आम्हाला टोमणे मारणे सुरू आहे. असेही यावेळी सामंत म्हणाले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, आमदार शेखरजी निकम, माजी आमदार सदानंदजी चव्हाण, भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, सदानंद भागवत, राजेश पत्याणे, अभिजीत शेट्ये, सुशांत मुळ्ये, मिथून निकम, सचिन बांडागळे राजेंद्र सुर्वे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, कृष्णा हरेकर, भाजपच्या नेत्या रश्मी कदम, देवरूखच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला तालुकाध्यक्षा मानसी करंबेळे, प्रेरणा पुसाळकर, संजय सुर्वे, हनिफ हरचिरकर, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे, ऋतुराज देवरूखकर आदिंसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन व सर्वांचे आभार प्रमोद अधटराव यांनी मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page