
वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणा-याविरोधात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वेबसाईट तयार करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
*मुंबई /प्रतिनिधी-* महाराष्ट्रा सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर 31 मार्च नंतर कारवाई केली जाणार आहे. यामुळे वाहनचालक HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत. मात्र, महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम उघडकीस आला आहे. या स्कॅमचे राजस्थान कनेक्शन उघडकीस आले आहे. सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसणूक केली जात आहेत. सायबर फसवणूक करण्यासाठी बनावट लिंकची निर्मिती केल्याचे निदर्शनास आले होते. पण आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे. उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे आली होती.
सहाय्यक परिवहन आयुक्तांनी 5 मार्चला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण सायबर फसणूक करणाऱ्या भामट्यांनी आता थेट सरकारी संकेतस्थळाप्रमाणे बनावट संकेतस्थळ बनवले आहे.
‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ नावानेच बनावट संकेतस्थळ करण्यात आले आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्याची निर्मिती राजस्थानमधून असल्याचे सायबर तज्ज्ञांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट मिळवण्यासाठी वाहनचालकांना महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन प्रोसेस करावी लागते. अर्ज सबमिट केल्यानंतर पेमेंट करावे लागते. यानंतर नजीकच्या फिटमेंट सेंटरमध्ये नंबर प्लेट बसवून दिली जाते.
एचएसआरपी किंवा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (High Security Registration Plate) ही अॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर ब्रँडेड 10 अंकी पिन असतो. या नंबर प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला असून तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ही नंबर प्लेट बनावट पद्धतीने बनवता येत नाही.