कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग या महामार्गावर रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी या दोन खाडी पुलांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आलीय.
मुंबई – कोकणातील मुंबई ते सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असणार आहे. 498 किलोमीटरच्या या महामार्गावर रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी या दोन खाडी पुलांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या प्रक्रियेत दिग्गज कंपन्यांनी सहभाग नोंदवलाय.
किनारा महामार्ग प्रकल्प….
मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास पर्यटकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो वेगवान करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळानं सागरी किनारा महामार्ग प्रकल्प सुरु केलाय. हा सागरी महामार्ग 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडं तर ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडं वर्ग करण्यात आला. या महामार्गासाठी 9000 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितलं.
कसा असेल महामार्ग….
हा महामार्ग कोकणातील किनाऱ्याच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हा सागरी मार्ग जाणार असून या महामार्गाची रायगड जिल्ह्यातील रेवस इथं सुरुवात होणार असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या सीमेवर असलेल्या रेडी इथं संपणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या सागरी रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम सुरु करण्यात येणार आहे. नव्यानं तयार करण्यात आलेल्या 498 किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरणही केलं जाणार आहे, तर काही मार्ग दुपदरी असणार आहेत असंही गायकवाड यांनी सांगितलं. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम करण्यात येणार असून 33 मुख्य गावं आणि शहरांच्या ठिकाणी बाह्य वळण रस्ते केले जाणार आहेत.
खाडी पुलांसाठी निविदा प्रक्रिया….
दरम्यान या सागरी मार्गावर आठ ठिकाणी खाडी पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. या आठ खाडीपुलांपैकी रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी या दोन खाडी पुलांच्या बांधकामासाठी महामंडळानं निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती. या निविदा प्रक्रियेला बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तर आगरदांडा ते दिघी या खाडी पुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि टी एन टी इन्फ्रा तसंच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यानी निविदा भरल्या आहेत. त्यामुळं आता लवकरच या दोन खाडीपुलांचं काम सुरु होईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.