श्रावण महिन्याची चाहूल लागली आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. या महिन्यात भगवान शिवची आराधना केली जाते. यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार (Shravan Somwar) आहेत? आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
*मुंबई :* श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, बालकवी त्र्यंबक ठोमरे यांची “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे” या कवितेची आठवण येते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना (Shravan Month) मानला जातो. यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 सुरू होतोय आणि 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यावर्षीच्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोमवार पासूनच श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत.
*किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी-*
*पहिला सोमवार –* 05 ऑगस्ट पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
*दुसरा सोमवार –* 12 ऑगस्ट दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
*तिसरा सोमवार –* 19 ऑगस्ट तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
*चौथा सोमवार –* 26 ऑगस्ट चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
*पाचवा सोमवार –* 02 सप्टेंबर पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.
*श्रावणात 72 वर्षांनी आला योग-*
श्रावणाची सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. तर 72 वर्षांपूर्वी म्हणजे 10 ऑगस्ट 1953 मध्ये श्रावणाची सुरूवात सोमवारी झाली होती. आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे. त्यामुळं यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे.
*भारतीय संस्कृतीची शिकवण-*
आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळं अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिले जायाचे. त्यामुळं देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढते. ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटते. घेणार्याला मूठभरातून काही मिळालंय याचं समाधान असते. ज्यांना मंदिरात जाता येत नाही, त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून शिवाचे स्मरण करावे. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावे.