
खेड :- तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी सकाळच्या सुमारास अशफाक बने यांचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले. यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मंगळवारी दि.२१ रोजी दुपारी झाली . त्यांची पत्नी व मुलगी हे त्यांच्या सोबत डेरवण येथे गेले. त्यांच्या घराला कुलूप लावून ते तिकडे गेले. बुधवारी दि.२२ रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घरातील वयरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने घराला वेढा घातला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण घर जळून गेले होते. खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू संपूर्ण घर जळाले होते. या घटनेत अशफाक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
