चिपळूण :- मौजे टेरव येथील वेतकोंढ पाण्याची टाकी पासून साधारण एक किलोमीटर अंतरावर डोंगरभागात विनापरवाना वृक्षतोड करून अंदाजे ६.५०० घनमीटर इतका लाकूडसाठा कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलेला असताना वन विभागाच्या क्षेत्रीय फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत स्थानिक चौकशी केली असता ही वृक्ष तोड नागेश यशवंत कदम यांनी केली असल्याचे समजल्याने अधिक चौकशीकरीता त्यांना टेरवगावचे पोलिस पाटील मोहिते यांचेमार्फत बोलावून घेण्यात आले. चौकशीदरम्यान नागेश यशवंत कदम यांनी केलेला गुन्हा निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द प्र.गु.रि.क्र.५/२०२३ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. वृक्षतोड झालेल्या क्षेत्रातील विखुरलेला लाकूडमाल जप्त केला असून कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलेला लाकूडमालाचे भट्टीपासून विलगीकरण केले आहे. यानंतर टेरव दत्तवाडी येथील अंतर्गत रस्त्याच्या पूर्वेकडील वराटी या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये फिरती दरम्यान वरील प्रमाणेच मालकी क्षेत्रामधील वृक्षांची अवैध तोड केल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी कोळशामध्ये रूपांतर करण्यासाठी रचून ठेवलेला लाकूड माल अंदाजे २३.५०० घनमीटर, तर वृक्षतोड झालेल्या क्षेत्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपातील ५.५०० घनमीटर इतर लाकूडमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवैधरित्या केलेली वृक्षतोड व कोळसा भट्टीसाठी रचलेला लाकूडमाल हा संतोष राजाराम कदम (रा.टेरव) याने केला असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने त्याच्याविरूध्द प्र.गु.रि.क्र. ६ / २०२३ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच मौजे टेरव गावच्या पूर्व दिशेस म्हसोबाचा माळ या ठिकाणी वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी, वनरक्षक रामपूर, वनरक्षक तपासणी नाका पोफळी आणि टेरव गावचे पोलीस पाटील यांनी जाउन फिरती केली असता दोन कोळसा भट्टी लावली असल्याचे आढळून आले. कोळसाभट्टी ही प्रमोद चंद्रकांत मोहिते (रा.टेरव) याने लावली होती. तो त्याचठिकाणी हजर होता . या ठिकाणी पेटवलेली कोळसा भट्टी उपस्थित वनाधिकारी यांनी उध्वस्त करून टाकली व सदर ठिकाणी उपस्थित प्रमोद चंद्रकांत माहिते याच्यावर प्र.गु.रि.क्र. ०७/२०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.