पुणे- राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होऊन पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज राज्यात बहुतांश जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. लक्षद्वीप आणि लगतच्या आग्नेय व पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज अधिक तीव्र होऊन कर्नाटक, गोवा, किनारपट्टी लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर स्थित आहे. त्यामुळे आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या महितीनुसार, आज व पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस, मराठवाड्यात दोन दिवस तर विदर्भात एक दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, येथे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.