मुंबई- मान्सून परतीचे प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत आणि उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यातील शाळांना तसेच महाविद्यालयांना शासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी ही स्थिती 30 सप्टेंबरपर्यंत टिकून राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. गुरुवारपासून पुढील 36 तासांपर्यंत नाशिक, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अंदाजे 120 ते 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
आज मोदींच्या पुण्यातील सभेवर पावसाचे सावट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आज पुण्यात मेट्रोसह 22 हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6.30 वा. त्यांची सभा होईल. मात्र आता या सभेवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मोदींची आजची सभा होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या वतीने त्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मुंबई, पुण्याला पावसाने झोडपले..
परतीच्या प्रवासावर असलेल्या मान्सूनने बुधवारी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या अनेक शहरांना व ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. मुंबईत 147.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यातही मुंबई पश्चिम उपनगरात 190.8 तर पूर्व उपनगरात 276.2 मिमी पाऊस पडला. रात्रीच्या वेळी झालेल्या या पावसामुळे राजधानीतील सर्व प्रमुख रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. परिणामी वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
वीज पडून दोन जण ठार..
कल्याणमध्ये वीज पडून दोन जण ठार झाले. तर गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने रेड अलर्ट तर पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. या दोन्ही शहरांसह ठाणे, पालघर, पिंपरी-चिंचवडमध्येही शाळा- महाविद्यालयांना गुरुवारी प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.
पुण्यात वाहतुकीची कोंडी..
पुण्यातील शिवाजीनगर व चिंचवड भागात सर्वाधिक 131 मिमी पावसाची नोंद झाली. या भागातील अनेक वसाहतीत पाणी साचल्याने वाहनांचे नुकसान झाले. जळगावात शहरात बुधवारी सायंकाळी 5 वाजता पाऊण तास जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळेत 30 मिमी पावसाची नोंद झाली. अजिंठा चौफुलीवर दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. नाशकातही मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
संभाजीनगरमध्ये 200 घरांमध्ये शिरले पाणी..
छत्रपती संभाजीनगरात बुधवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहर चिंब झाले. मात्र रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकदारांची दैना झाली. 200 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. रात्री 8.30 वाजेपर्यंतच्या 12 तासांमध्ये 36.8 मिमी नोंद झाली.