नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असून पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेत आहेत. नाशिक येथे नुकतीच सभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉँग्रेसच्या मतदारांना भाजपशी जोडावेत अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला,
अमित शहा म्हणाले की, काहीजण केवळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवतात. परंतु, आम्ही देश घडवण्यासाती निवडणूक लढवतो, सध्या 16 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तुम्ही सगळे मिळून जेवढ्या जागा जिंकल्यात त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे, पुढे बोलताना अमित शहा यांनी 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची बहुमताने सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका…
महाराष्ट्रातील 2024 ची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. एक कार्यकर्ता म्हणून एक संकल्प घेऊन पक्षाचे काम करा. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचा ठपका पुसून टाका. त्यांच्याकडून आपला आत्मविश्वास खचवला जात आहे. जोशात नाही तर धैर्याने निवडणुकीला सामोरे जा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे…
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, कलम 370 रद्द होईल, राम मंदिर होईल असे कुणाला वाटत होते का? आता हिवाळी अधिवेशनात वक्फ कायदा मंजूर करणार आहोत. नक्षलवाद आणि दहशतवाद अंतिम घटका मोजत आहे. देशाच्या सीमेवर छेडछाड केल्यास घरात घुसून कारवाई केली जाणार आहे. भारत लवकरच जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. पण विरोधकांना याबाबत काही देणघेण नाही, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे.