पुणे :* राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
त्यामुळे आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.*
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चार उपविभागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. कोकण, गोव्यामध्ये आज व उद्या काही ठिकाणी तर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी तर पुढील दोन दिवस म्हणजेच १० व ११ ऑक्टोबरला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील सातही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवस काही ठिकाणी त्यानंतर चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यात नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.*
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज ९ तारखेला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे व वीजांच्या कडकडासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर विदर्भात अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१० तारखेला रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा व मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.