चेंबूर : प्रणील.पडवळ चेंबूर रेल्वे स्थानक परिसरासह बाहेरील फूटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे; मात्र चेंबूर रेल्वे स्थानकातील फेरीवाले अजूनही हटवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
चेंबूर परिसरात प्रवाशांची कायम वर्दळ असते. अशात रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ अनेक फेरीवाले विविध वस्तूंची विक्री करत आहेत. यांचा नाहक त्रास प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले आणि महिलांना होत आहे. चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेरील फूटपाथही या फेरीवाल्यांनी गिळंकृत केला होता. याबाबत पालिका आणि पोलिस विभागाकडे नागरिकांनी तक्रार केली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून अचानक पोलिसांनी कारवाई केली. असे असले तरी चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात २० ते २५ फेरीवाले बसतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर ज्या प्रकारे मोकळा करण्यात आला, त्याप्रमाणे रेल्वे विभागाने कारवाई करून येथील फेरीवाले हटवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
जाहिरात