
मनोज जरांगे पाटील यांच्या “खोचक” शुभेच्छा…
नरेंद्र मोदीनी रविवारी (ता.7 जून) रोजी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
मात्र मोदींनी गरिबांसाठी काम करावं, श्रीमंतासाठी काम करणं बंद करावं, तरच त्यांना शुभेच्छा असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. मराठा आंदोलकांना त्यांनी यावेळी शांततेचं आवाहन केलं.
शेतकऱ्यांनी अंतरवाली सराटीत गर्दी करु नये असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी यावेळी केलं. ते म्हणाले, “सध्या मराठवाड्यात आणि राज्यात पावसाचे आगमन होत आहे. मला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत गर्दी करू नका, येऊ नका. त्यापेक्षा शेतीची कामे करा, मराठा समाजासाठी लढायला मी खंबीर आहे.”
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करणं, तसंच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे इत्यादी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांन पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा कालचा (रविवार ता.9 जून) दुसरा दिवस आहे. सरकारला चर्चा करण्यासाठी दारं खुली आहेत. मात्र, अद्याप सरकारकडून संपर्क झाला नाही. सरकारची काय भावना आहे? हे मला माहिती नाही, असं जरांगेंनी यावेळी सांगितलं.
मोदींना शुभेच्छा पण…
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मोदींनी गरिबांसाठी काम करावं, श्रीमंतासाठी कामं करणं बंद करावं, तरच त्यांना शुभेच्छा.” यावेळी जरांगे यांनी बीड जिल्ह्यात कोणाची बदनामी करू नका, वाईट स्टेटस ठेऊ नका, शांतता राखा, असं आवाहन मराठा आंदोकांना केलं.
तसेच एखादी पोस्ट टाकली म्हणून एखाद्या समाजाला दोष देऊ नका. असं मी निवडणुकीआधीच सांगितलं होतं असं जरांगेंनी सांगितलं. ते म्हणाले, एखाद्याने पोस्ट टाकली असेल म्हणून समाजाला दोष देणं चुकीचं आहे. सरकारकडून सध्या कोणतीही हालचाल नाही, सरकारची भावना मला माहिती नाही, लढणं माझं काम आहे. सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असेल, आम्हाला भेटायला कधी यायचं हे सरकार ठरवेल. मात्र ते मुद्दाम असंच ते करत राहिले तर विधानसभेला घरी बसतील, असा थेट इशाराच जरांगे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. तसंच राजकारण हा आमचा मार्ग नाही. पण नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.