अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्रातल्या या १० जागांमध्ये आठ खासदार निवडून आले आहेत. त्यानंतर शरद पवारांचं प्रचंड कौतुक होतं आहे. ज्या ठिकाणी शरद पवार असतात तिथला स्ट्राईक रेट जास्तच असतो असं वक्तव्य जयंत पाटील यांनी मागच्याच आठवड्यात केलं होतं. त्यानंतर शरद पवार १० जूनच्या पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता होती.
मोदींचं सरकार लंगडं अससल्याची शरद पवारांची टीका
निवडणूक निकालांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण त्यांना बहुमताची संख्या म्हणजेच २७२ जागा मिळालेल्या नाहीत. एनडीएच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. शरद पवार हे १० जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात काय बोलणार? याची उत्सुकता कायम होती. या मेळाव्यात त्यांनी मोदींचं सरकार लंगडं असल्याचं म्हटलं आहे. तसंच अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर ‘भटकता आत्मा’ या टीकेवरुन मोदींनाही टोला लगावला आहे.
निलेश लंकेंचं कौतुक
“खरं सांगायचं तर निलेश लोकसभेत चालल्यावर मला एका गोष्टीची काळजी आहे, आमचे जे जे जुने सभासद संसदेत आहेत ते मला नक्की विचारतील, हा कोण गडी आणला? मी आज तुम्हाला (निलेश लंके) सांगतोय तिथे शुद्ध मराठीतही भाषण करता येतं. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा माईक हातात आला की निलेश लंके मराठीत काय बोलतील याचा भरवसा नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
“राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे”, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
मोदी बेफाम माणसासारखे वागले
“मोदींनी शिवसेनाबाबत उल्लेख केला की, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की, त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्याप्रकारची त्यांची स्थिती झाली”, अशी टीका शरद पवारांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या. त्यातल्या पुण्यातल्या सभेत अजित पवार मंचावर असताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता. त्यावरुन पंतप्रधान मोदींवर बरीच टीका झाली होती. शरद पवारांनी त्यावेळीही त्यांना उत्तर दिलं होतं. तसंच आता वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही उत्तर दिलं आहे.