सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना,2024-25 वर्षात झालेल्या 360 कोटी खर्चास, 2025-26 साठी 406 कोटी नियोजनास मंजुरी….

Spread the love

रत्नागिरी :  सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात झालेल्या  360 कोटी खर्चास आणि सन 2025-26 साठी 406 कोटीच्या नियोजनास आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. कॅन्सरपासून खबरदारी म्हणून 1 लाख महिलांना एचपीव्ही लसीचा एक डोस देणे आणि कॅन्सर डिटेक्शन व्हॅन घेण्याचा निर्णय घेतानाच पुढील 5 वर्षासाठी सिंधुरत्न समृध्द योजना सुरु ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा ठराव करण्यात आला.   बीएसएनएलने पुढील दोन महिन्यात मिशन मोडवर जिल्ह्यातील टॉवर सुरु करुन, नेटवर्क सुधारणा करुन सातत्य ठेवावे,अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज सभा झाली. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होते. खासदार नारायण राणे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार निरंजन डावखरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहून सभेला सुरुवात झाली. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमधील कार्यपूर्ततेवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी याबाबत सविस्तर आढावा दिला. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जिल्हा परिषदेकडे असणारे 5 कोटी 12 लाख रुपये आणि नगरपालिकेकडे असणारे 8 कोटी 50 लाख, एमआयडीसीने 5 एकर जागा दिलेली आहे. यामधून घनकचरा प्रकल्प अत्याधुनिक पध्दतीने उभा करावा. ज्या ठिकाणी भाड्याच्या जागेत ग्रामीण रुग्णालये आहेत, त्याठिकाणी पुढच्या एक महिन्यात डायलेसिस सेंटर सुरु करावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या कामगिरीबाबत बैठक घ्यावी. त्या बैठकीला प्रांताधिकारी, महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे. पूर्वीचे असणारे टॉवर्स चालू करणे.  मंजूर असणारे नवीन टॉवर्स बसवून ते सुरु करणे, दोन महिन्यात मिशन मोडवर बीएसएनएलने अखंडित नेटवर्क सुविधा सुरु करावी. 

9 ते 14 वर्षे वयोगटातील महिलांना कॅन्सरची खबरदारी म्हणून एचपीव्ही लसीचा एक डोस एक लाख महिलांना देण्यात येणार आहे.  मॅमोग्राफी, सव्हार्यकल कॅन्सर, ओरल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन खरेदी करत आहोत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी 108 रुग्णवाहिकेला दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावर कायमस्वरुपी परवानगी द्यावी.  जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णवाहिका किती आहेत, त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या रुग्णवाहिका आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे याबाबतचा अहवाल द्यावा. त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल.  कोरोना काळात खरेदी केलेले साहित्य, सीएसआरमधून मिळालेले साहित्य याबाबतही माहिती द्यावी. 

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 7 हजार 753 महिलांना पत्र पाठवा*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नावे कमी झालेल्या 7 हजार 753 महिलांना जिल्हा माहिला व बालविकास अधिकाऱ्यांनी आजच पत्रे पाठवावीत. ही नावे योजनेमधून का कमी झाली, त्याबाबतचे स्पष्ट कारण पत्रामध्ये लिहावे. त्याबरोबर ज्या लाभार्थ्यांची केवायसी अद्याप झालेली नाही ती तातडीने करुन घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page