संगमेश्वर – बालपणापासून कांही मुलांच्या अंगी काही उपजत चांगले गुण असतात. हुशारी,चातुर्य, तर्कशुध्द, अंदाज, पाठांतर,उत्तम स्मरण,खेळात,अभ्यासात आवड अशा गुणांचा योग्य वेळी विकास झाला तर अशी मुले प्राथमिक शिक्षणापासूनच पालक,शिक्षक,मार्गदर्शन व स्वतःची जिद्द ठेवून पुढे वाटचाल करतात.अशीच गार्गी गौरी घनश्याम घडशी ही.गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे इयत्ता सहावीत शिकत आहे.
गार्गी अशा स्पर्धेत नेहमीच भाग घेऊन अभ्यासाचे सातत्य राखत असते.नुकत्याच पुणे येथील बालेवाडी येथे ” सक्सेस अबॅकस अ़ॅन्ड एजुकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ”च्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत भाग घेऊन उत्तुंग कामगिरी दर्शवीत एक लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांमधून स्वतःची जिद्दी, चिकाटी परिश्रमाने तिने स्वतःला सिद्ध केले आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर , अभिनेते स्वप्निल जोशी, सक्सेस अबॅकसचे मुख्य सीईओ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गार्गी ही पेन्शन फायटर घनश्याम घडशी यांची कन्या असून मुलीही कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा संगमेश्वर मधील सर्व सभासदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.