
राजापुर:- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित गडदुर्ग मोहीमेला शिवस्मारक राजापूर येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांना वंदन करुन यावर्षीच्या ऐतिहासिक मोहीमेला सुरवात करण्यात आली. या मोहीमेचे मोहिमप्रमुख शिलेदार अभिजित नार्वेकर यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मोहीम समन्वयक विवेक गुरव, मंदार बावधनकर, मोहीम व्यवस्थापक मोहन घुमे, प्रसन्न देवस्थळी, किरण तुळसावडेकर, निकेश पांचाळ, सुरज पेडणेकर. या महिमेचे मार्गदर्शक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, शिलेदार प्रवीण बाणे, अधि.पराग मोदी, मंदार पेणकर, राजू मोरे, संतोष कदम, पंकज बावधनकर, विजय पुजारी व अनेक शिलेदार उपस्थित होते.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवले. हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष श्री दीनानाथ कोळवणकर, दिलीप गोखले, चंद्रशेखर मोंडे, सुधीर विचारे यांनी मोहीमेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवतीर्थ जयघोषांनी दणाणून गेले होते.
यानंतर जोशाने स्फूर्तिदायक अश्या घोषणा देत मोहीमेने कुडाळच्या दिशेने गिरीदुर्ग रांगणा दुर्गाच्या दिशेने प्रयाण केले. गडाच्या पायथ्याशी पोहचल्यावरती महादेवाचे आणि महिषासुरमर्दीनी रांगणाई देवीचे स्मरण करुन गडपूजन करण्यात आले. गडाचे पूजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.महेश मयेकर यांनी केले. शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिलेदारांनी जयघोष करत रांगणा गडावरती चढाई करायला सुरवात केली.
ऐतिहासिक शिवकालाचं स्मरण करत, दमछाक करणा-या खडतर अश्या चढाई नंतर नियोजना प्रमाणे रांगणा गडावर शिलेदारांनी दुर्ग रांगणाची पहाणी केली.
या छोट्या शिलेदारांनी बाजी मारली आणि गडावरती पहिल्यांदा दाखल झालेत या मोहीमेमध्ये छोट्या शिलेदारांचा (८ ते १२ वर्षे) उत्साह मोठ्यापेक्षाही वाखाणण्यासारखा होता. दुस-या दिवशी सकाळी मंदिरात सर्वानी भजन व आरती केली. नंतर सर्व शिलेदारांसमवेत गडदेवतांचे पूजन विवेक गुरव यांनी केलं. लवकरात लवकर हिंदुराष्ट्र म्हणजेच रामराज्य येऊदेत अशी सर्वांनी प्रार्थना केली.
दोन दिवसांच्या गडावरील वास्तव्यात शिलेदारांनी रांगणा गडावरील, कोल्हापूर दरवाजा, घोडे बाव विहीर, छत्रपतींचा राजवाडा, निंबाळकरांचा वाडा, रांगणाई देवी मंदिर, मंदिरा जवळील धर्मशाळा, मंदिरा जवळील विहीर, शिवकालिन तलाव, हत्तीची सोंड माची, टकमक टोक, टेहळणी बुरूज, हनुमान मंदिर, महादेवाची तीन मंदिरे (एकत्र दोन पिंडी असलेली), गणेश मंदिर, निळेली दरवाजा, पाली दरवाजा, षटकोनी (तुपाची) विहीर, शिवकालिन भुयार, कोकण दरवाजा इत्यादी ठिकाणांना भेट देऊन तेथील स्थानिक माहितगाराकडून (गाईड) माहिती घेतली.
यामध्ये प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी शिवकार्य म्हणून रांगणाई मंदिराच्या बाजूची विहीर स्वच्छ करून अनेक वर्षांची घाण व गाळ बाहेर काढला. त्याच सोबत अनेक वर्षे (जवळपास ५/६ वर्षे) बंद असलेली नारुर गावात उतरणारी कोकण दरवाजा हि वाट स्वच्छ करुन मोकळी केली.