मंडणगड / प्रतिनिधी- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुणे – पिंपरी (सौदागर) येथील रोजलॅंड रेसिडेन्सी सोसायटीचे ट्रस्टी श्री. चंदन चैरासिया यांच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्याना सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, माजी अध्यक्ष श्री. अमर साबळे, अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, अतिथी श्री. पाताडे, श्री. गायकवाड, संचालक अथर्व इदाते, प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमात माजी खासदार व संस्थेचे माजी अध्यक्ष मा. श्री. अमर साबळे यांनी सांगितले की, पद्श्री दादा इदाते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालुक्यात शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचे पवित्र काम केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या महाविद्यालयाची स्थापना करुन येथील दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिक्षणसारख्या पवित्र कार्यास मदत करण्यासाठी दानशुर व्यक्ती सदैव तत्पर असतात. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथील श्री. चंदन चैरासिया यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना सायकली भेट दिल्या आहेत. एस.टी.ची सोय नसल्यामुळे अनेक किलोमीटर पायी चालत येऊन शिक्षण घेणा-या वि विद्यार्थ्यासाठी ही निकडीची गरज होती. सायकलीमुळे विद्यार्थ्याना महाविद्यालयास येणे सोयीचे होणार आहे. विद्यार्थ्यानी या संधीच लाभ घेऊन, चांगला अभ्यास करुन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांनी रोजलॅंड रेसिडेन्सी सोसायटीचे ट्रस्टी श्री. चंदन चैरासिया यांनी केलेल्या मदतीबदद्ल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी याची गरज होती. सायकलीमुळे विद्यार्थ्यानाचा वेळ वाचणार असून या वेळेचा उपयोग त्यांनी निश्चित अभ्यासाठी करावा असे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले. तर शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी मानले.