माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास…

Spread the love

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गुरुवारी (२६ डिसेंबर) दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. त्यानंतर लगेचच त्यांचं निधन झालं. 92 वर्षीय मनमोहन सिंग यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंं होतं. मनमोहन सिंग यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लगेच एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसचे नेते दिल्लीला रवाना होत आहेत. यासंदर्भात काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सांगितलं की, आम्ही सगळे कार्यक्रम रद्द करत आहोत आणि दिल्लीला रवाना होत आहोत.


आर्थिक उदारीकरणाचा जनक – मनमोहन सिंग यांना 1991 ते 1996 या काळात तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. याच काळात सिंग यांनी देशाला गंभीर आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या दूरदर्शी नेतृत्वानं, त्यांनी आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण यासह महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांचा परिचय करून दिला. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये भरीव वाढ आणि परिवर्तन झालं.

आर्थिक वाढीमध्ये लक्षणीय प्रगती – अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या यशानंतर, सिंग पंतप्रधानपदावर आले. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या अंतर्गत 2004 ते 2014 पर्यंत सलग दोनवेळा पंतप्रधान म्हणऊन काम केलं. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ भारताच्या आर्थिक वाढीमध्ये लक्षणीय प्रगतीचा होता. त्यांनी प्रशासन, भ्रष्टाचार घोटाळे आणि राजकीय संबंधित समस्यांसह अनेक आव्हानांचा सामना केला.

आधुनिक आर्थिक इतिहासात केंद्रस्थानी – 2014 मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही सिंग हे भारतीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व राहिले. त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केलं. त्यांनी आसाम राज्याचं प्रतिनिधीत्व केल. जिथे आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि कौशल्य अत्यंत प्रशंसनीय होते. ते एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले आणि संसदेच्या वरच्या सभागृहातील त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित राजकीय कारकिर्दीचा अंत झाला. एक राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा वारसा भारताच्या आधुनिक आर्थिक इतिहासात केंद्रस्थानी राहिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page