रत्नागिरी | प्रतिनिधी : एमएसएमई च्या रत्नागिरी औद्योगिक महोत्सवात उपस्थित प्रमुख पाहुणे माजी खासदार निलेश राणे यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले. ते म्हणाले, एका बाजूला असलेला सिंधुदुर्ग आणि दुसरीकडे असलेला रायगड जिल्हा यांची प्रगती सातत्याने होताना दिसते. सिंधुदुर्गाच्या शेजारी गोवा आहेच पण राणे साहेबांच या जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. तर रायगडची भिस्त मुंबईवर असल्याने या दोन्ही जिल्ह्यांची भरभराट झाली आहे. पण तीच क्षमता, तेच नैसर्गिक स्त्रोत,तीच माणसे आणि त्याच संधी असतानाही रत्नागिरीचा विकास रखडलेला आहे, इथला माणूस प्रगतीची, उत्तम जीवनाची प्रतीक्षा करत आहेत. अशावेळी एमएसएमईच्या माध्यमातून रत्नागिरीसाठी विशेष लक्ष देण्याची मागणी यावेळी निलेश राणे यांनी केली. प्रस्तावित रिफायनरी आणि एमएसएमई हे एकत्र आल्यास रत्नागिरीचा बॅकलॉग भरण्यास वेळ लागणार नाही. रत्नागिरीतील 80 टक्के नागरिक रिफायनरीच्या बाजूने आहेत तर 20 टक्के नागरिक हे विरोधात आहेत. रिफायनरीसाठी बारसू येथे 90 टक्के जमीन एमआयडीसीने घेतली असून, प्रकल्प आल्यास मोठे शहर या ठिकाणी उभे राहिल.
त्यामुळे चंद्रावर उद्योग व्यवसाय करण्याची स्वप्ने बघण्यापेक्षा ज्यांना ही औद्योगिक प्रगती नको आहे त्यांनाच चंद्रावर पाठवू अशी मिश्कील टिपणी निलेश राणे यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या भाषणानंतर केली.
रत्नागिरीसह कोकणातील माणसाचे चित्र आळशी असे मुद्दाम रंगवेलेले आहे, मात्र तो कष्टाळू आहे, तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण राणे साहेब असे असे सांगत आम्ही चंद्रावरही व्यवसाय करू असे प्रतिपादन माजी आ. प्रमोद जठार यांनी यावेळी केले.