मुंबई /प्रतिनिधी- माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची ज्या पक्षातून आणि ज्या चिन्हावर आपल्या ४० वर्षांच्या राजकारणाची सुरुवात झाली, त्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी मेळावा होत असून त्यामध्ये मी शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी पत्र परिषदेत केली. नीलेश राणे म्हणाले, २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यासमवेत मी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मला सहकार्य केले, मला समजून घेतले आणि साथही दिली.
१९ वर्षांनी धनुष्यबाण
खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडून १९ वर्षे झाली. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत त्यावेळी होते, आजही आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. १९ वर्षांनी पुन्हा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याची संधी मिळणे, हे आपल्यासाठी बहुमोलाचे आहे, असे नीलेश राणे यांनी सांगितले.
नारायण राणे यांच्या राजकारणाची सुरवात झालेल्या पक्षात मला काम करण्याची संधी मिळत आहे. केवळ कुडाळमधून निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करणार आहोत. कुडाळमधून धनुष्यबाणवर निवडणूक लढवणार असे राणे यांनी स्पष्ट केले.
तर भाजपमध्ये मला शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला कायम लहान भावासारखी वागणूक दिली. भाजपमध्ये सर्वच नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, ते कायम राहतील. आज जास्त काही बोलण्यासारखे नाही. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याची जी संधी मिळाली त्याचा आनंद आहे. पक्षांने काही हवा काढली नाही. मी शिस्त आणि प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे, असेही राणे यावेळी म्हणाले.