रत्नागिरीमध्ये उद्योगनिर्मिती झाली तरच सर्वसामान्य रत्नागिरीकर स्थिरावेल. – माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन…

Spread the love

“देशाचे पंतप्रधान भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलर्स करून तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी विविध स्तरांवर अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अनेक स्टार्टअप्स नव्याने निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन देशाच्या कानाकोपऱ्यात युवक स्थिरस्थावर झाले. मात्र रत्नागिरीकरांचा ओढा अजूनही मुंबईकडे असलेला पहायला मिळतो. राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचा अभाव हेच  यामागचे खरे कारण आहे असे मी ठामपणे म्हणू शकतो.” असे म्हणत माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीतील युवकांच्या स्थलांतराविषयी खंत व्यक्त केली.

“गेल्या २० वर्षांमध्ये रत्नागिरीतून मुंबईत झालेले स्थलांतर अभूतपूर्व आहे. आता गावांमध्ये तरुण आणि मध्यमवर्गीय दिसत नाहीत. त्यामुळे कोकणातील समृद्ध शेती व्यवसायही लयास गेला आहे. गणेशोत्सव आणि होळीसारख्या सणांना गजबजलेली खेडी ओस पडू लागल्याने गावरहाटी कशी चालणार याबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.” अशा शब्दांत बाळ माने यांनी जनसामान्यांच्या व्यथा मांडल्या.

“भाकरी तिकडे चाकरी हा या मातीचा गुण नाही. पण रत्नागिरीकरांनी त्याचे चटके सहन केले आहेत. क्रियाशील सरकारचा भाग असूनही मुळातच लोकांविषयी आत्मीयता नसेल तर जनकल्याणाची कामे होतील तरी कशी?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“उद्योगांना स्थगिती दिल्याबाबत वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांतून समोर येत आहेत. मात्र नवीन उद्योग येत असल्याबाबत फार माहिती प्रसिद्ध होताना दिसत नाही. माझे स्पष्ट म्हणणे आहे, रत्नागिरीला समृद्ध करण्यासाठी उद्योगाशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी आता मुंबईकर आणि स्थानिकांनी एका विचाराने काम करण्याची गरज आहे. खेड्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी लोकांनी एकत्रित यावे लागेल आणि लोकांनी एकत्रित येण्यासाठी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगनिर्मिती करावी लागेल. त्यामुळे हे त्रांगडे सोडवण्यासाठी नागरिकांनी सारासार विचार करावा हीच अपेक्षा.” असेही ते म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page