नवीमुंबई- नवीमुंबई विमानतळाच्या नव्या कोऱ्या धावपट्टीवर शुक्रवारी दुपारी पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याला वॉटर सॅल्युटद्वारे मानवंदना देण्यात आली.
नवी मुंबई विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही या धावपट्टीपासून काही अंतरावर उड्डाण करत फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. C295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आलं होते. C-295 या विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्यामुळे आता लवकरच नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प रखडला आहे. मात्र, आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्यांचे काम पूर्ण झाले आहे. मे 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची घोषणा झाल्यापासूनच या पट्ट्यातील जमिनी आणि घरांचे दर वधारले होते. या भागात गेल्या काही वर्षांमध्ये कनेक्टिव्हिटीच्यादृष्टीने अनेक पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी झाली होती. अटल सेतू, मेट्रो आणि रस्ते मार्गामुळे नवी मुंबई विमानतळाला उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.