संभाजीनगरात मागितली पॅलेस्टाइनसाठी दुवा:मालेगाव, नगरमध्ये फडकले ध्वज; संभाजीनगरात पावणेतीन लाख मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण….

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- रमजान ईदनिमित्त गुरुवारी छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर झालेल्या सामूहिक नमाजप्रसंगी लाखो मुस्लिम बांधवांनी इस्रायल-पॅलेस्टाइन रक्तरंजित संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टाइन नागरिकांसाठी दुवा मागितली. तर मालेगाव येथे नमाज पठणानंतर आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा संदेश सुरू असताना एका तरुणाने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकवला. नगरमध्ये कोठला परिसरात ईदगाह मैदानाबाहेर संरक्षण भिंतीलगत असलेल्या

महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगरात रमजान ईदनिमित्त गुरुवारी छावणीच्या ईदगाह मैदानावर पावणेतीन लाख मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. प्रत्येक वर्षी रमजान ईदची नमाज अदा करताना मानवतेच्या रक्षणासाठी दुवा मागितली जाते. यापूर्वी कोरोना, त्सुनामी, भूकंप आदी नैसर्गिक संकटांत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दुवा मागितली होती. गुरुवारी इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनी नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही दुवा मागितली, असे छावणी ईदगाह समितीचे सदस्य एम. ए. अजहर यांनी सांगितले.

मालेगावात पॅलेस्टाईन ध्वज फडकावला….

मालेगावात रमजान ईदनिमित्त कॅम्परोडवरील ईदगाह मैदानावर गुरुवारी झालेल्या नमाज पठणानंतर एका तरुणाने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकवला. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे शहराचे प्रमुख धर्मगुरू तसेच जामा मशिदीचे पेश इमाम आहेत. नमाज अदा झाल्यानंतर मौलाना मुफ्ती हे पारंपरिक पद्धतीने इस्लामचा संदेश देतानाच उपस्थितांचे प्रबोधन करतात. याच पद्धतीने त्यांचे प्रबोधन सुरू असतानाच त्यांनी पॅलेस्टाइनमधील स्थितीवर भाष्य केले. याचवेळी जनसमुदायात पॅलेस्टाइनचा ध्वज घेऊन बसलेला तरुण अचानक उभा राहिला. त्याने नजरेत येईल अशा पद्धतीने बराच वेळ ध्वज फडकावला तसेच तो मौलाना यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो तरुण कोण होता हे लक्षात आले नाही. पोलिस तपास करत आहेत.

आपला संबंध नाही आमदार मौलानांचे स्पष्टीकरण….

आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी पॅलेस्टाइनविषयी भाष्य केल्यानंतर तरुणाने ध्वज फडकवला. याविषयी पत्रकारांनी मौलाना मुफ्ती यांना विचारले असता त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

नगरमध्येही पॅलेस्टाइनचा झेंडा तत्काळ उत्तरवला…

शहरातील कोठला परिसरात असलेल्या ईदगाह मैदानाबाहेर संरक्षण भिंतीलगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कोतवाली पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच महापालिकेला सूचना देऊन तो झेंडा काढण्यात आला. याप्रकरणी मनपाचे कर्मचारी मुजमील राजू पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. मात्र, गुरुवारी या प्रकरणाला वाचा फुटली. रमजान ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण होते. त्याच ठिकाणी हा झेंडा का लावला गेला? याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी महापालिका प्रशासनाला याप्रकरणी फिर्यादी देण्याची सूचना केली. मनपाचे प्रशासक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी मुजमील पठाण यांना फिर्याद देण्यासाठी प्राधिकृत केले. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाइन रक्तरंजित संघर्षामुळे समर्थन…

मध्य पूर्वेत इस्रायल अाणि पॅलेस्टाइन यांच्यात घनघोर युद्ध सुरू अाहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील हमास संघटनेने इस्रायलवर हजारो रॉकेट डागून हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाइनच्या कब्जात असलेल्या गाझा पट्टीवर हल्ला केल्याने युद्धाचा भडका उडाला आहे. यात गाझा पट्टीत ३३ हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले असून हजारो परागंदा झाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page