नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण…

Spread the love

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमधील पंचवटी रामकुंड तीर्थावर, तर त्र्यंबकेश्वर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण संपन्न झालं.

नाशिक – त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, शनिवारी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमधील पंचवटी रामकुंड तीर्थावर, तर त्र्यंबकेश्वर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रुगेरी पिठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण संपन्न झालं. यावेळी साधू-महंत, राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा 31 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यापासून सिंहस्थ सुरू झाला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पंचवटी रामकुंड तीर्थावर, तर त्र्यंबकेश्वर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रुगेरी पिठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण संपन्न झालं.


नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण (नाशिक जिल्हा माहिती कार्यालय)
यावेळी आखाड्याचे साधू-महंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, नितेश राणे, नरहरी झिरवळ यांच्यासह खासदार, आमदार, नगरसेवक उपस्थित होते.


नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांचं रामकुंड परिसरात 11 वाजून 40 मिनिटांनी आगमन झालं. याठिकाणी गोदा पूजनात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर गोदावरी नदीचं पूजन करण्यात आलं. नंतर ध्वजस्तंभाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला.

ऑक्टोबरपासून गोदावरीच्या तीरावर पुरोहित संघाच्या वतीने 3 दिवसीय विशेष यज्ञ आणि धार्मिक विधीं सुरू आहेत. आजच्या ध्वजारोहणानंतर 1 नोव्हेंबरला श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होणार असल्याचं पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितलं आहे.


कुंभमेळा श्रद्धेचा संगम –

सिंहस्थ कुंभपर्व म्हणजे केवळ बारा वर्षांनी भरणारा धार्मिक मेळा नव्हे; तो भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला स्पर्श करणारा श्रद्धेचा महासंगम आहे. येथे भाषा वेगवेगळ्या असतात, प्रांत वेगवेगळे असतात, संप्रदाय आणि उपासनेच्या परंपराही भिन्न असतात; मात्र सर्वांना जोडणारा भक्तिभाव एकच असतो. काळाच्या प्रवाहात अनेक पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, आधुनिकतेची नवी क्षितिजे खुली झाली; मात्र गोदावरीच्या तीरावर उमटणाऱ्या भक्तीच्या पाऊलखुणा कधी पुसल्या गेल्या नाहीत. पूर्वजांनी जपलेली सिंहस्थाची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढील पिढ्यांकडे प्रवाहित होत आहे. त्या परंपरेचा धागा अधिक दृढ करणारा आजचा धर्मध्वजारोहण सोहळा ठरला. गोदामाईच्या साक्षीने फडकलेली धर्मध्वजा ही केवळ धार्मिक अस्मितेची खूण नसून, हजारो वर्षांच्या सांस्कृतिक स्मृतींना वर्तमानाशी जोडणारे पवित्र प्रतीक ठरली.



यंदा 21 महिने कुंभमेळा –

यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी योग घेऊन आला आहे. साधारणतः गुरू ग्रह हा कोणत्याही राशीत 13 महिने कालावधीसाठी असतो. त्यामुळे सिंहस्थसुद्धा 13 महिनेच असतो. परंतु यंदा सिंहस्थ हा 21 महिने इतक्या कालावधीचा राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे, ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह सरळ जातो किंवा वक्री होतो, म्हणजे मागील घरात परत येतो. आज 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू असला तरी दोन वेळा त्यात खंड पडणार आहे.



कसा आहे धर्मध्वज स्तंभ? – मुख्य धर्मध्वज स्तंभ हा 51 फूट उंच असून, तो पंचधातूंचा असून त्यावर समुद्रमंथनातून आलेल्या 14 रत्नांचे चिन्ह साकारण्यात आले आहे. दुसरा धर्मध्वज स्तंभ 31 फूट उंच पंचधातूचा आहे. त्यावर देखील समुद्रमंथनातून आलेल्या 14 रत्नांचे चिन्ह आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page