
सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे.
नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण 31 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती स्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यभरातून 1317 व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात आखाड्यांचे प्रमुख, पुरोहित संघाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.
तीन दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन –
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणासाठी तीन दिवसीय कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. यात 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधीने सोहळ्यास सुरुवात होईल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांसह साधू महंतांच्या उपस्थितीत पूजन व हवन होईल. दुपारी मुख्य ध्वज काळाराम मंदिरातून तपोवन मैदानावर आणला जाईल. यानंतर तपोवनमार्गे गणेशवाडी, मेनरोड, चांदीचा गणपती मंदिरामार्गे मिरवणूक निघेल. सायंकाळी 7 च्या दरम्यान मिरवणूक रामकुंडावर पोहोचल्यावर महाआरती होणार आहे.

31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचं रामकुंडावर आगमन होईल. जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज आणि साधू-महंत यांच्या उपस्थितीत गंगा मंदिराजजवळील यज्ञशाळेत राष्ट्रपतींकडून स्थापित देवतांचे पूजन होईल. त्यानंतर रामतीर्थावर गंगाभेट, मुख्य स्तंभ पूजन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होऊन गंगेची महाआरती होणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी शृंगेरीचे शंकराचार्य विधुशेखर भारतीतीर्थ यांच्या उपस्थितीत देवतांचे पूजन, हवन आणि स्तंभपूजन होणार आहे, अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली.

नो ड्रोन पॅराग्लाइडिंग झोन घोषित –
“ध्वजारोहण सोहळ्यासाठी विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिक जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील क्षेत्रात ड्रोन उड्डाण व पॅराग्लायडिंग करण्यास 30 व 31 ऑक्टोबर 2026 रोजी निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागात कुठेही कोणीही या दोन दिवसात ड्रोन उड्डाण करू नये, विनापरवानगी ड्रोन उड्डाण केल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.
71 शाळांना सुट्टी –
सिंहस्थ कुंभमेळाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते पंचवटीतील रामकुंड येथे ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने पंचवटी आणि जवळच्या परिसरातील 71 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबत आदेश जारी केलेत. तसेच 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी गोदा घाटावरील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

मान्यवरांना निमंत्रण –
राज्यातील 29 मंत्री, तसंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, 288 विधानसभा आमदार, विधान परिषदेचे 78 आमदार, 48 खासदार, नाशिकचे 122 नगरसेवक, 17 नगरपालिका नगराध्यक्ष, 125 अधिकारी, 200 पुरोहित संघाचे पदाधिकारी, 300 साधू -महंत यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणारा आहे.
रस्त्यांवर बंदी –
31 ऑक्टोबर रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. यासाठी रविवार कारंजा ते अहिल्याबाई होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, मुख्य बाजारपेठेतून रामकुंडाकडे जाणाऱया मुख्य मार्गावर वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मखमलाबाद नाक्याकडून पंचवटी आणि कपालेश्वर मंदिर रामकुंडाकडे येणारा रस्ता ब्लॉक करण्यात आला आहे. गोदावरी नदीवरील गाडगे महाराज पूल आणि रामसेतू पुलावरून रामकुंडाकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. भद्रकाली व मेनरोडकडून रामकुंडाकडे जाणाऱ्या अंतर्गत गल्ल्या व जोड रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

रामकुंड परिसरात थ्रीडी मॅपिंग लाइट्स –
ध्वजारोहणाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गोदा घाटावर विशेष प्रकाश योजना साकारण्यात येणार आहे. संपूर्ण रामकुंड परिसराला डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंग व पिक्सेल लाईट्सने सुशोभित करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकाच वेळी प्रत्येक दिव्याचा रंग, ब्राईटनेस आणि दिवे पेटण्या विझण्याची गती संगणकावरून स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणार आहे. तसेच सोळ्याच्या थेट प्रक्षेपणासाठी रामकुंड, गाडगे महाराज पूल, कपालेश्वर मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या माध्यमातून 1200 हून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*