
मच्छिमार समाजाच्या सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मच्छिमारांना दिले आश्वासन
मुंबई :- राज्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा मासेमारी व्यवसायाशी नाळ असणाऱ्या कोकणातील लोकप्रतिनिधीला मत्सव्यवसाय मंत्रिपद मिळाल्यामुळे सातही सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याने शेकडो वर्षांपूर्वी पासून ह्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या वाचा फोडण्याचे काम मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून नीतेश राणेंच्या माध्यमातून होणार असल्याची आशा मच्छिमार समाज बाळगत असल्याची भावना अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी मंत्री नितेश राणेंच्या भेटी दरम्यान बोलून दाखवले.
मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून राणेंची झालेल्या नियुक्तीचे स्वागत मच्छिमार समितीकडून करण्यात आले असून भारत स्वतंत्र झाल्यापासून मच्छिमार समाजाचे प्रश्न जैसेथे असल्याने आता पर्यंत मंत्रीपद भूषविणारे सर्व मंत्रांनी फक्त पैसे लाटण्याचे काम केले असल्यामुळे सन १९९९ पासून जेवढ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्रीपद भूषवले आहे त्या सर्वांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे आणि काहींच्या उतरता काळाला सुरुवात झाली आहे.
सन १९९९ पासून झालेले मंत्री मखराम पवार, पद्मसिंह पाटील, मिनाक्षीताई पाटील, अनिस अहमद, रविशेट पाटील, नितीन राऊत, मधुकरराव गायकवाड, अब्दुल सत्तार, एकनाथ खडसे, महादेव जानकर, अस्लम शेख आणि नुकतेच मंत्रीपद भूषविणारे सुधिर मुनगंटीवार आदींना ह्या विभागामध्ये काम करताना अशाश्वत मासेमारीला प्रोत्साहन, मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर सातत्याने अन्याय, अवैध मासेमारीला प्रोत्साहन, समुद्र किनारी विध्वंसक प्रकल्पांना रेटून नेण्याचे काम अश्या सर्व चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे ह्या सर्वांची राजकीय कारकिर्दीला कलंक लागल्याची आठवण तांडेल यांनी राणेंना केली. एवढेच नव्हे तर ज्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं गुलाबराव देवकर, अर्जुन खोतकर, भास्करराव जाधव, दत्तात्रय भरणे आदींना राजकीय शाप ह्या विभगाने दिले असल्याचे चित्र दिसून आले आहे.
ह्या सर्व एकेकाळचे दिग्गज मंत्र्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोळी समाजावर केलेला अन्यायाचे फळ त्यांना मिळाले असल्याचे समाजात दबक्या आवाजात बोलले जात असून हा विभाग शापित नसून ह्या विभागातील मंत्र्यांनी केलेले काम अनैतिक असल्याने त्यांना नियातीकडून मिळालेले त्यांच्या कार्याचे फळ असल्याचे तांडेल यांनी मत व्यक्त केले.
ह्या सर्व मंत्र्यांना लागलेला राजकीय कलंक वगळता फक्त एकाच मंत्र्याला ह्या विभागाने वरदान दिले असून आणि हे मंत्री दुसरे-तिसरे कोणी नाही तर माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे. युती सरकार मध्ये सन १९९५ साली नारायण राणेंनी मत्स्यव्यवसाय मंत्रिपद भूषविले होते आणि तदनंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचा मान संपादला होता. त्यामुळे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून मच्छिमार समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य नितेश राणेंकडून अपेक्षित असल्याचे तांडेल यांनी मंत्री महोदयाकडे साकडे घातल्याची माहिती समितीचे महीला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिली.
ताडदेव बेलासिस ब्रीज येथील ब्रीज च्या बांधकामांमुळे बाधित होणाऱ्या मासळी विक्रेत्या कोळी महिलांचे ताडदेव मध्येच योग्य पुनर्वसन करणे, पालघर जिल्ह्यातील MIDC मुळे खाड्या मृत झाले असून त्यांना पुनर्जीवित करणे, कोळीवाड्यातील राहत्या घराखालच्या जमिनी मच्छिमारांच्या नावे होणे, मुंबईतील मासळी मार्केट मधील समस्या सोडविणे, पावसाळी अवैध मासेमारी वर आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची समन्वय समिती गठीत करणे, अवैध पर्ससीन नेट आणि एल .ई.डी लाईट मासेमारीवर आळा घालणे, मच्छिमारांची कर्ज माफी करणे, वाढवण बंदर कायमचे रद्द करणे आदी प्रश्नांकडे नितेश राणेंचे लक्ष वेधण्याचे काम मच्छिमार समितीकडून करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सचिव जयेश तांडेल यांनी दिली.
येणाऱ्या काळात मच्छिमारांच्या सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन नितेश राणेंनी मच्छिमार शिष्ट मंडळाला दिले आहे. मच्छिमार समितीकडून समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, महिला अध्यक्षा नयना पाटील, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, सचिव जयेश तांडेल, मच्छिमार नेते रवींद्र पांचाळ आदी उपस्थित होते.
*देवेंद्र दामोदर तांडेल*
*अध्यक्ष :- अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती*