नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं पंतप्रधान पुष्प कमल दहल यांना 40 कलमी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये नेपाळची हिंदू देश म्हणून पुनर्स्थापना करणं आणि पुन्हा राजेशाही पुनर्स्थापित करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली Hindu kingdom Demand In Nepal : भारताच्या शेजारील असलेला नेपाळ हा देश हिंदू देश होता. मात्र त्यानंतर नेपाळचा हिंदू देशाचा दर्जा काढून घेण्यात आला. आता नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं (RPP) नेपाळ देशाला हिंदू राज्य आणि घटनात्मक राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं बुधवारी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांना 40 कलमी मागण्या सादर केल्याचं नेपाळच्या आघाडीच्या वृत्तपत्रानं दिलं आहे. हिंदी देश आणि घटनात्मक राजेशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी शांततापूर्ण मोहीम सुरू करणार असल्याचं पक्षानं जाहीर केलं आहे.
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं केली मागणी :
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काठमांडूच्या विविध परिसरात रॅली काढून ही मागणी केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं पंतप्रधान पंतप्रधान पुष्प कमल दहल यांची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं आपल्या मागण्या त्यांच्याकडं सादर केल्या आहेत. “राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष शांततापूर्ण निदर्शनं करणार आहे. मात्र सरकारनं त्याकडं दुर्लक्ष केल्यास क्रांतीचा पर्याय निवडेल,” असं या आघाडीच्या वृत्तात पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र लिंग्डेन यांच्या हवाल्यानं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नेपाळमध्ये 2015 ला धर्मनिरपेक्ष देश घोषित केलं :
नेपाळच्या संसदेनं 2015 मध्ये नवीन संविधान लागू करुन धर्मनिरपेक्ष देश घोषित केलं होतं. 2008 च्या सुरुवातीलाच नेपाळला धर्मनिरपेक्ष देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र आता राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं नेपाळला हिंदू देश म्हणून पुन्हा घोषित करण्याची मागणी का करत आहे, त्यासह घटनात्मक राजेशाहीची मागणी पुन्हा का करण्यात येत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष हा घटनात्मक राजेशाही आणि हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाची स्थापना 1990 मध्ये माजी पंतप्रधान सूर्य बहादूर थापा आणि लोकेंद्र बहादूर चंद यांनी केली होती.
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष हिंदू देश आणि राजेशाहीचा पुरस्कर्ता :
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं 1997 मध्ये सूर्य बहादूर थापा आणि लोकेंद्र बहादूर चंद यांच्या नेतृत्वाखाली दोन आघाडी सरकारचं यशस्वी नेतृत्व केलं. या दोघांना 2000 च्या दशकात तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं होतं. यात लोकेंद्र बहादूर चंद यांना 2002 मध्ये तर सूर्य बहादूर थापा यांना 2003 मध्ये पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं होतं. 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं 14 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष या निवडणुकीत पाचव्या स्थानांवर होता. असं असतानाही राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष 25 फेब्रुवारी 2023 ला विरोधी पक्षाकडं वळला. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षानं सातत्यानं हिंदू राज्य आणि संवैधानिक राजेशाहीचा पुरस्कार केला आहे. मनोहर पर्रीकर इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसचे रिसर्च फेलो आणि नेपाळच्या राजकीय विश्लेषक निहार आर नायक यांच्या मते, ही मोहीम गेल्या काही काळापासून सुरू आहे. 2008 मध्ये राजेशाही संपल्यानंतर ही मागणी पुन्हा जोर धरत असल्याचं त्यांनी यावेळी ईटीव्ही भारतला सांगितलं आहे.