डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी राबवले स्वच्छता अभियान ,१५०० सदस्यांचा सहभाग ,७०८ किलो ओला कचरा , १७१३७ किलो सुका कचरा ,अडीच ते तीन तास अभियान…

Spread the love

रत्नागिरी : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा, अलिबाग) श्री सदस्यांनी रविवारी रत्नागिरी शहर परिसर चकाचक केला. स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित केला. रत्नागिरी शहरात १५०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला. ७०८ किलो ओला कचरा आणि १७१३७ किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला.

रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ते आरटीओ ऑफिस, त्यानंतर एसटी स्टॅंड, राम आळी, पऱ्याची आळी, गाडीतळ, कॉंग्रेस भवन नाका, टिळक आळी, आठवडा बाजार रोड, प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या सर्व भागामध्ये कचरा गोळा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता श्री सदस्यांनी हाती झाडू घेऊन कामाला सुरवात केली. सदस्यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. या सदस्यांनी केरसुणी हाती घेतली. ओला कचरा, सुका कचरा गोळा करायला सुरवात केली. साधारण १० वाजेपर्यंत ही सफाई मोहीम सुरू होती. आज देशभरात श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले. रत्नागिरी तालुक्यातील श्री सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

हे अभियान डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित म्हणाले की, दरवर्षी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येते. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. कालच नानासाहेबांची जयंती साजरी झाली. स्वच्छता मोहीम, जलसंवर्धन उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात. कित्येक वर्ष हे काम केले जात आहे. शहरात सफाई मोहीम सुरू आहे, श्री सदस्यांच्या कार्याला सलाम करतो.

मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर म्हणाले की, धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र व देशभर हा उपक्रम राबवला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याचप्रमाणे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान लोकांच्या मनाची सफाई आणि प्रत्यक्षात कचरा गोळा करून सफाईचे काम करत आहे. शहरवासिय, ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानाचे काम पुढे नेले पाहिजे. ज्या ज्या वेळेला अभियान होईल, त्यावेळी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे.

देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये म्हणाले की, साडवली, सह्याद्रीनगर, आठवडा बाजार परिसरात श्रमदान करून स्वच्छता उपक्रम राबवला. त्याबद्दल जी सेवा केली त्याबद्दल प्रतिष्ठानच्या साधकांचे मनःपूर्वक आभार मानतो. स्वच्छता करावीच लागते. कारण अनेक लोक अस्वच्छता करतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page