गोवा | पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गोव्यात याल आणि ‘सेल्फी’ काढू इच्छित असाल किंवा इतर पर्यटकांचे फोटो काढू इच्छित असाल, तर प्रथम त्यांची परवानगी घ्या जेणेकरून त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल. ही सूचना गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी जारी केलेल्या सल्ल्याचा एक भाग आहे आणि पर्यटकांच्या गोपनीयतेचे, त्यांच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे आणि समाजकंटकांकडून त्यांची फसवणूक होण्यापासून रोखणे हा त्यामागील उद्देश आहे.
“इतर पर्यटक/अज्ञात लोकांच्या परवानगीशिवाय सेल्फी किंवा फोटो काढू नका, विशेषत: सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहताना, जेणेकरून त्यांच्या गोपनीयतेचा आदर करता येईल,” असे गुरुवारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
यामध्ये पर्यटकांना धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच विभागाने गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना वारसा स्थळांची नासधूस किंवा नुकसान न करण्याचा सल्ला दिला असून, प्रवाशांनी बेकायदेशीर खासगी टॅक्सींचा वापर करू नये आणि मीटरच्या भाड्याचा आग्रह धरावा, असे सांगण्यात आले आहे. पर्यटकांना केवळ पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.