नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचे मळभ दूर व्हायला चार दिवस लागले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जोर देत असताना केंद्रीय नेतृत्व मात्र सर्व बाजूंचा विचार करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात काल या विषयावर दीर्घ चर्चा झाल्याचे समजते.
काल बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मराठा मतांवर काय परिणाम होईल, याचा आढावा शाहांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतांबाबत शाहांनी माहिती घेतली. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा असताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील समीकरणे जाणून घेतल्याबद्दल भाजपाकडून इतर राज्यांप्रमाणेच धक्कातंत्राचा वापर केला जाणार का? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याची चर्चा होत आहे.
निकाल लागून पाच दिवस झालेत मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अन् त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलननाने घेतलेलं व्यापक स्वरूप यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाच्या मतांचा कल अत्यंत महत्वाचा ठरला. अशातच आता सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये देखील मराठा समाजाला दुखावलं जाऊ नये, असा सूर दिसतो आहे. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा झाली.
महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप जो मुख्यमंत्री करेन, त्याला पाठिंबा असेल, असं म्हटलं. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री असेल. हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जरी दिल्लीतून हिरवा कंदील असला तरी त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण? हा अद्याप प्रश्नच आहे.