धर्मवीर आनंद दिघे यांनी अयोध्येत निर्माण होणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी ठाण्यातून पाठवली होती पहिली चांदीची वीट.

Spread the love

ठाणे ; निलेश घाग राम मंदिरासाठी १९८७ साली महाराष्ट्रातील ठाणे शहरातील टेंभी नाक्याहून पहिली चांदीची वीट आयोध्या येथे पाठवण्यात आली होती. ठाण्यातील त्याकाळचे शिवसेनेचे वाघ म्हणून ओळखले जाणारे अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी ती विट रवाना केली होती. दिघेसाहेब हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी शिवसेना राम मंदिराच्या निर्माणासाठी पुढे होती. राम मंदिर निर्माणासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा उघड पाठिंबा असल्याने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तसेच बाबरी ढाचा पाडण्याच्या पाच वर्षे आधी आनंद दिघे साहेबांनी पहिली चांदीची वीट बनवून घेतली. ही वीट नवरात्रोत्सवात पूजनासाठी आणण्यात आली. टेंभी नाका येथे असलेल्या कनुभाई या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडून ही वीट आनंद दिघे यांनी बनवून घेतली होती.ही वीट पूर्णतः चांदीची बनवलेली होती तर तिचे वजन सव्वा किलो इतके होते. त्यावर जय श्रीराम असे लिहिण्यात आले होते. ती बनवताना साहेबांनी लक्ष घातले होते. मात्र लोकांचा उत्साह पाहून याच विटेची आणखीन एक प्रतिकृती बनविण्यात आली. या प्रतिकृती मध्ये चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा मुलामा देण्यात आला होता. खरी चांदीची वीट ही पूजा करून कार सेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली. तर त्या विटेची प्रतिकृती ठाण्यातील टेंभी नाका येथे सात दिवस ठेवण्यात आली होती.
येथील संत पुरुष गजानन महाराज पट्टेकर यांच्या हस्ते विटेचे पूजन करण्यात आले होते. दिघे साहेबांचे तत्कालीन सहकारी तसेच नाक्यावरील वल्लभभाई मजेठिया उत्तमचंद सोलंकी, मांगीलाल परमार,भालचंद्र घुले,नंदकुमार शेडगे,देविचंद सोलंकी आदी या सोहळ्यास उपस्थित होते. याच दरम्यान टेंभी नाक्यावर ५८ फुटाचा श्रीरामाचा कट आऊट उभारण्यात आला होता.संपूर्ण ठाणे शहर राममय वातावरणात ढवळून निघालं होत येथील सर्वच शिवसैनिक त्यानंतर झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचे.टेंभी नाका येथे असलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी या पूजनाच्या दिवशी हजेरी लावली होती. त्यांच्यासाठी दिघे साहेबांचा आदेश सर्वकाही होता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन तो सोहळा पार पाडला. त्यावेळी दिघे साहेबांबरोबर तिथे उपस्थित प्रत्येकाचा उत्साह वेगळाच होता. नवरात्रोत्सवात हे पूजन करण्यात आले होते. तर आता शिवसेनेच्या विविध पदांवर असलेले पदाधिकारी त्यावेळी कार्यकर्ते म्हणून आनंद दिघे यांच्या सोबत होते. आनंद दिघे यांनी सात दिवस टेंभी नाका येथे ती वीट दर्शनाला ठेवली होती. त्यामुळे रामभक्त रांगा लावून त्या विटेचे दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यासोबत धर्मवीर आनंद दिघे यांनी ५१ फुटी रामाचे कटआऊट टेंभी नाका येथे उभारले होते. आनंद दिघे साहेब हे निर्भीड होते. कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यामुळे बाबरी पाडण्यासाठी देखील ते गेले होते. त्यामुळे टेंभी नाका येथील आनंदाश्रमावर सीबीआयाने धाड देखील टाकली होती, असे आताचे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांनी सांगितले. आता ३३ वर्षानंतर राम मंदिरचे निर्माण सुरू होणार आहे. त्यामुळे ज्याची मुहूर्तमेढ आनंद दिघे यांनी रोवली, ते कार्य पूर्ण होणार असल्याने तेव्हाच्या शिवसैनिकांनी आणि टेंभी नाका येथे ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,नगरसेवक सुधीर कोकाटे,कमलेश चव्हाण,बाळा चाचड,संतोष ताठारे,जॅकी भोईर,भारत शिंदे, प्रमोद मलमल,गजानन म्हात्रे,प्रकाश चव्हाण,संजू रेवळेकर,हेमंत परमार तसेच व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page