
मुंबई- महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या शपथविधीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरले नाही. अशातच, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेंच्या भेटीसाठी फडणवीस थेट त्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. या दोघांमध्ये बैठक झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपसील अद्याप समोर आलेला नाही.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्व सुरु असताना विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. यातच महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही महायुतीमधील तिढा सुटला नाही अशी चर्चा आहे. यातच एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास आर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपसील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या भेटीनंतर तरी महायुतीतील तिढा सुटणार का? मंत्रिपदांचा आणि खातेवाटपाचा तिढा सुटणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.